‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री चाहत खान हिने पती फरहान मिर्झावर शारीरिक आणि मानसिक शोषणाचे आरोप केले आहेत. तीन महिन्यांपूर्वी चाहतने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. २०१३ मध्ये चाहत आणि फरहान यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना दोन मुली आहेत.
‘मी माझ्या वैवाहिक आयुष्यात अजिबात खूश नाही आणि पतीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय मी विचारपूर्वक घेतला आहे. घटस्फोटाला माझ्या पतीचा विरोध आहे पण मी त्याच्यासोबत एक क्षणसुद्धा राहू शकत नाही,’ असं चाहतने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
पतीच्या संशयवृत्तीमुळे घटस्फोट घेत असल्याचंही तिने स्पष्ट केलं. ‘त्या व्यक्तीने माझं केवळ शारीरिक नाही तर मानसिक शोषणसुद्धा केलं आहे. सहकलाकारांसोबत माझं अफेअर असल्याचे आरोप त्याने केले आहेत. इतकंच नव्हे तर माझ्या शूटिंगच्या सेटवर तो कधीही अचानक हजर व्हायचा. एकदा माझ्या एका सहकलाकाराने मला पार्टीला बोलावलं होतं आणि त्याला माझ्या पतीने डेट समजून आरोप केले,’ असंही ती पुढे म्हणाली.
वयाच्या १६व्या वर्षापासून चाहत छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. २००२ साली ‘सच्ची बात सभी जग जाने’ या टीव्ही शोमधून तिने पदार्पण केलं. काही चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली आहे. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील भूमिकेमुळे चाहत घराघरात पोहोचली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 12:53 pm