‘बाहुबली’ सिनेमात कटप्पाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सत्यराजने सुमारे ९ वर्षांपूर्वी कावेरी पाणी वादावर केलेल्या वक्तव्याबद्दल आता माफी मागितली आहे. काही कन्नड संघटनांनी ‘बाहुबली २’ हा सिनेमा कर्नाटकमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता अभिनेता सत्यराजने कन्नड भाषिक जनतेची माफी मागितल्यामुळे हा सिनेमा शांततापूर्वक पद्धतीने प्रदर्शित होईल. एएनआयच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. सत्यराज म्हणाला की, ‘मी कर्नाटकच्या विरोधात नाही. ९ वर्षांपूर्वी दिलेल्या विधानाबद्दल मी तुमची माफी मागतो.’ त्याच्या या विधानावर सध्या अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोकांनी त्याच्या या विधानाचे समर्थन केले तर काहींनी तीव्र विरोध. सत्यराजबद्दल प्रतिक्रिया देताना एका युझरने लिहिलेय, ‘हा असा अभिनेता आहे, जो संकट आल्यावर आपलं विधान बदलतो.’

काय होतं प्रकरण?
२००८ मध्ये तामिळ शेतकऱ्यांच्या एका मीटिंगमध्ये सत्यराजने कर्नाटकमधून पाण्याची मागणी करण्याचे समर्थन केले होते. ‘तुम्ही त्या झाडासारखे बनू नका ज्यावर कोणताही कुत्रा येऊन लघवी करुन जातो.’, असे सत्यराज म्हणाला होता. कट्टर कर्नाटक समर्थकांनी सत्यराजच्या या विधानाचा विरोध केला. या विधानात कुत्रा या शब्दाचा वापर कर्नाटकमधील लोकांसाठी केला होता. असेही म्हटले जात होते की, कुत्रा हा शब्द सत्यराजने कन्नड कार्यकर्ता वतल नागराजसाठी वापरला होता.

या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी एका व्हिडिओद्वारे कन्नड समर्थकांना बाहुबलीच्या टीमने घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष न करण्याची विनंती केली. कर्नाटकमध्ये सिनेमावर बंदी घालून सत्यराजला याचा काहीही फायदा किंवा नुकसान होणार नाही हेही त्यांनी या व्हिडिओमधून सांगितले. मला कन्नड भाषा फार चांगल्या पद्धतीने बोलता येत नाही त्यामुळे काही चुकले असेल तर मला माफ करा असे स्पष्टिकरण राजामौली यांनी दिले. काही वर्षांपूर्वी सत्यराजने जे विधान केले होते, त्याचा बाहुबली टीमशी काहीही संबंध नाही. हे त्याचे वैयक्तिक मत आहे. आम्हाला काही महिन्यांपूर्वीपर्यंत या प्रकरणाबद्दल माहितही नव्हते.