News Flash

‘बाहुबली’चा तीन दिवसांत ५०० कोटींचा गल्ला

जगभरातून चित्रपटाच्या कमाईचा आकडा ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

‘बाहुबली दोन’

 

गेली दोन वर्षे सातत्याने चर्चेत राहिलेल्या एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे तिकीटबारीवर कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे वितरण घेतले होते. शुक्रवारपासून तीन दिवसांत हिंदी आवृत्तीने १२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातून चित्रपटाच्या कमाईचा आकडा ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

पहिला ‘बाहुबली’ प्रदर्शित झाला होता त्यावेळीही त्या चित्रपटाने तिकीटबारीवर घसघशीत कमाई करत इतिहास रचला होता. संपूर्णत: भारतीय पौराणिक कथा, देशी तंत्रज्ञान वापरून उभे केलेले सेट्स, प्रचंड प्रमाणावर व्हीएफएक्स तंत्राचा वापर करून प्रेक्षकांसमोर आलेल्या या चित्रपटाने बॉलीवूडमधील दिग्गजांना आपली दखल घ्यायला लावली होती. त्यामुळे दोन वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित होत असताना एकीकडे हा इतिहास पुन्हा रचला जाईल, अशी आशा एकीकडे तर दुसरीकडे या चित्रपटाची उगाच हवा निर्माण केली जाते आहे, अशा दोन मतप्रवाहांमध्ये ‘बाहुबली २’ अडकला होता. मात्र शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सगळ्या चित्रपटगृहांवर प्रेक्षकांनी एकच गर्दी करत प्रतिसाद दिल्याने तो सुपरहिट असल्याचेच ‘कन्क्लुजन’ निघाले आहे.

करण जोहरने ‘ऐतिहासिक आठवडा’ असा उल्लेख करत ‘बाहुबली २’च्या हिंदी आवृत्तीने शुक्रवारी पहिल्या दिवशी ४१ कोटी रुपये, शनिवारी ४०.५ आणि रविवारी ४६.५ कोटी रुपये कमाई करत तीन दिवसांत १२८ कोटींचा पल्ला गाठला आल्याची माहिती दिली आहे. याशिवाय, या चित्रपटाच्या तेलुगू, मल्याळम आवृत्तीला दक्षिण भारतासह अमेरिकेतही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात १२१ कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरातून २१७ कोटींची कमाई केली. त्यामुळे बॉलीवूडचा शंभर-दोनशे कोटी क्लबमध्ये पहिल्याच दिवशी मुसंडी मारण्याचा अनोखा विक्रम चित्रपटाने साधला आहे. दुसऱ्या दिवशी जगभरातून ३८२ कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी पाचशे कोटी रुपयांचा आकडा पार केला असल्याचे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.

‘बाहुबली २’ या चित्रपटाला सातासमुद्रापार मोठे यश मिळाले आहे. उत्तर अमेरिकेत सर्वाधिक कमाई करत पहिल्या तीन चित्रपटांमध्ये येण्याचा मान या चित्रपटाला मिळाला आहे. परदेशात रेनट्रॅक पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया दोन्ही ठिकाणी चित्रपटाला प्रचंड यश मिळाले आहे. बॉलीवूडमध्ये तर आमिर खानच्या ‘दंगल’ आणि सलमानच्या ‘सुलतान’ने केलेले विक्रम ‘बाहुबली २’ने आधीच मोडीत काढले असून अवघ्या तीन दिवसांत पाचशे कोटींचा आकडा पार करणारा हा चित्रपट आता हजार कोटींचा पल्ला गाठणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 3:04 am

Web Title: bahubali 2 box office collection
Next Stories
1 सेलिब्रिटी क्रश : ‘हाय.. मी सुकीर्त’
2 कतरिनामुळे शाहरुखसाठी इन्स्टाग्राम आता आणखीनच सुंदर
3 टेलिफोन बूथप्रमाणे ठिकठिकाणी शौचालयंही हवीत- अक्षय कुमार
Just Now!
X