करोना विषाणूशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. प्रत्येक जण या महामारीपासून वाचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. सरकारदेखील विविध योजनांची अंमलबजावणी करत असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहे. तर करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामध्येच सरकारची मदत व्हावी यासाठी काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने  आर्थिक मदत केली आहे. प्रभासने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

चीनपासून फैलाव झालेल्या करोना विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. त्यामुळे या विषाणूच्या कचाट्यामध्ये आतापर्यंत अनेक जण सापडले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या उपचारासाठी अभिनेता प्रभासने तब्बल ४ कोटी रुपयांच्या आर्थिक मदत केली आहे.

प्रभासने ४ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीच्या माध्यमातून दिले आहेत. तर उर्वरित ५०-५० लाख रुपये अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिले आहेत.

दरम्यान, प्रभासप्रमाणेच दाक्षिणात्य कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. पवन कल्याण, रामचरण,चिरंजीवी, महेश बाबू या कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. पवन कल्याण यांनी २ कोटी रुपये मदतनिधी म्हणून दिले असून महेश बाबूने १ कोटी रुपयांची मदत केली आहे.