अभिनेत्री सोनम कपूर गेले काही दिवस तिने केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. कधी आपल्या भावाला सल्ला देणारी, तर कधी दीपिकापेक्षा प्रियांका चांगला अभिनय करते असे म्हणत सोनमच्या वक्तव्यांविषयी अनेक चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा एकदा सोनम तिच्या वक्तव्यामुळेच चर्चेत आली आहे. संपूर्ण भारतात आणि चित्रपट विश्वामध्ये विविध विक्रम मोडित काढणाऱ्या ‘बाहुबली’ या चित्रपटाशी सोनमने तिचे नाते उघड केले आहे.
चित्रपटगृहे आणि रसिकांच्या मनावर छाप पाडलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटामध्ये एक भूमिका साकारण्यासाठी सोनम कपूरला विचारण्यात आले होते असा खुलासा तिने एका कार्यक्रमाममध्ये केला आहे. अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘#नोफिल्टरनेहा’ या कार्यक्रमामध्ये सोनमने हा खुलासा केला आहे. या कार्यक्रमामध्ये गप्पा मारताना सोनमने तिच्या अंदाजामध्ये काही चित्रपटांचा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘बाहुबली’ या चित्रपटाचेही नाव होते. तेव्हा सोनम म्हणाली की, ‘मी हा चित्रपट पाहिलेला नाही’. असे म्हटल्यानंतर लगेचच ती म्हणाली की, ‘मी या चित्रपटाची संहिता वाचली आहे. कारण मला या चित्रपटाबाबत विचारण्यात आले होते’. सारे काही ठिक असताना सोनमने या चित्रपटाला नकार का दिला हाच प्रश्न आता अनेकांना पडत आहे.
पण, चित्रपटाला नकार देण्याचे कारण मात्र सोनमने स्पष्ट केलेले नाही. या चित्रपटाला मिळालेली लोकप्रियता पाहता नंतर सोनमला तिच्या निर्णयाचा पश्चातापच झाला असावा. या चित्रपटामध्ये सोनमला कोणत्या रोलसाठी विचारण्यात आले होते यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्हच आहे. दरम्यान सध्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अगदी जोमात तयारी सुरु आहे. अभिनेता प्रभास, राणा डग्गुबती या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकांसाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘बाहुबली २’ या चित्रपटामधून ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ या प्रश्नाचे उत्तर मिळणार असल्याची चर्चा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 5:53 pm