‘फॅण्टम’, ‘एक था टायगर’ चित्रपटांचा दिग्दर्शक कबीर खान याला कराची विमानतळावर पाकिस्तानी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कराचीत होणाऱया एकदिवसीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी कबीर खान विमानतळावर दाखल होताच काही पाकिस्तानी नागरिकांनी कबीर विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच त्याला चपला देखील दाखविण्यात आल्या. पाकविरोधात चित्रपट बनवून काय मिळाले?, तुझे आमच्या देशातील प्रत्येक नागरिक चपला दाखवून स्वागत करेल, पाकिस्तान झिंदाबाद..कबीर खान मुर्दाबाद.. अशा घोषणा देत विमानतळावर उपस्थित एका घोळक्याने कबीरविरोधात निदर्शने केली. यावेळी कबीरने कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून जाणे पसंत केले.
दरम्यान, कबीर खान दिग्दर्शित ‘एक था टायगर’ चित्रपटावर पाकिस्तानात बंदी टाकण्यात आली होती, तर ‘फॅण्टम’ चित्रपटाविरोधात जमात-उद-दवा संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदने टाकलेल्या याचिकेनंतर लाहोर न्यायालयाने या चित्रपटावरही बंदी घातली होती. मात्र, कबीर यांच्या ‘बजरंगी भाईजान’ला पाकिस्तानात चांगला प्रतिसाद मिळाला होता.