शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट २५ जानेवारीला संपूर्ण देशभरात प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांसाठी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात येईल अशी माहिती ‘ठाकरे’चे निर्माते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
दिल्लीत या शोचं आयोजन करण्यात येईल. या चित्रपटासाठी सेना- भाजपातील अनेक राजकीय नेते उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. भाजप- सेना युतीत आलेला दुरावा मिटवण्यासाठी ‘ठाकरे’चं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात किंवा संसदेतील थिएटरमध्ये स्पेशल शोचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती संजय राऊत यांनी एका वृत्तपत्राला दिली. याची तारीख आणि वेळ अजूनही निश्चित व्हायची आहे असंही राऊत म्हणाले.
काही दिवसांपूर्वी ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित होते. आता स्पेशल स्क्रीनिंगला मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदी उपस्थिती राहणार हे पाहण्यासारखं ठरले. तसेच दिल्लीतील स्पेशल स्क्रीनिंगसाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का हे देखील गुलदस्त्यातच आहे. मराठी आणि हिंदी भाषेत ‘ठाकरे’ प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेंबाच्या भूमिकेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 10:52 am