बॉलिवूड कलाकारांनी केलेला ‘बाला डान्स’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. खरं तर, ‘बाला डान्स’ म्हटले की, डोळ्यांसमोर येते ते कोकण. कारण येथे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या नृत्याला ‘बाला डान्स’ म्हटले जाते. परंतु हा कोकणात केला जाणारा डान्स नाही. तर बाला चित्रपटातील गाण्यावर केला जाणारा डान्स आहे.

अभिनेता अक्षय कुमार याने बॉलिवूड कलाकारांना दिलेला ‘बाला चॅलेंज’ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. अक्षयने दिलेले हे आव्हान वरुन धवन, रणवीर सिंग, करिना कपूर, अर्जून कपूर, कियारा अडवाणी यांसारख्या अनेक कलाकारांनी स्विकारले असुन ते बाला डान्स करताना दिसत आहेत. या मंडळींनी डान्स करतानाचे आपले व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य चाहत्यांमध्येही या ‘बाला डान्स’ची क्रेज पाहायला मिळत आहे.

अकाली केस गळतीशी झगडणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाला हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन केले जात आहे. परंतु हा चित्रपट आयुष्यमानपेक्षा अक्षय कुमारच्या ‘बाला चॅलेंज’मुळेच जास्त चर्चेत आहे.

बॉक्स ऑफीसवर भिडणार दोन टकले

एकाच वेळी दोन चित्रपट प्रदर्शित होणे, ही आता फारशी नवी गोष्ट उरलेली नाही. गेल्या काही काळात चक्क तीन ते चार चित्रपट एकाच वेळी प्रदर्शीत झाल्याचे आपण पाहिले आहे. परंतु हा येता महिना प्रेक्षकांसाठी विषेश आहे. कारण कधी नव्हे ती, बॉक्सऑफीसवर एकाच वेळी दोन टकल्यांची टक्कर पाहायला मिळणार आहे. अर्थात हे टकले म्हणजे दोन वेगवेगळ्या चित्रपटातील मध्यवर्ती पात्रे आहेत.

येत्या सात नोव्हेंबरला अभिनेता आयुष्मान खुरानाचा ‘बाला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या बरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ नोव्हेंबरला ‘सोनू के टीटू की स्वीटी’फेम सनी सिंगचा ‘उजडा चमन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गंमतीशीर बाब म्हणजे हे दोन्ही चित्रपट केस नसलेल्या व्यक्तिंच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर आधारित आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना ‘बाला’ या चित्रपटात अकाली केस गळतीशी झगडणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. टक्कल पडण्याच्या समस्येमुळे आत्मविश्वास गमावलेल्या तरुणाची ही कथा आहे. तसेच ‘उजडा चमन’ हा देखील अशाच प्रकारच्या विषयावर आधारित चित्रपट आहे. यात वयाच्या तिशीत टक्कर पडायला सुरुवात झालेल्या तरुणाची ही कथा आहे. आता तिकीटबारीवर यापैकी कोणता टकला बाजी मारतो, आणि कोणता टकला टक्कल धरुन बसतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल.