05 August 2020

News Flash

रंगतदार ‘बाला’ख्यान

शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हा मुख्य कथाविषय आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बाला

सुंदरतेच्या तथाकथित चौकटीत न बसणारे, आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर या चौकटीत बसण्यासाठी आवश्यक असलेल्या कुठल्या ना कुठल्या फुटपट्टीत कमी पडलेले असे अनेकजण आपल्या बाजूला आहेत. ते आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये असतात, आपल्या कुटुंबात असतात, शेजारीपाजारी असतात. सर्वत्र असतात. ते नेहमीच आपल्याबरोबर असतात, पण त्यांच्यातले कमीपण हे त्यांच्या आयुष्यात कितीतरी मोठे वादळ घेऊन आलेले असते, याची पुसटशीही जाणीव आपल्याला होत नाही. अशा व्यक्तीची हसतहसत का होईना खिल्ली उडवण्यापलीकडे आपण फार काही थोर करत नाही. ही आपलीच उथळ विचारसरणी पिढय़ा दर पिढय़ा पुढे जात राहताना आणखीनच वरवरची होत जाते, आपलेच भान आपल्याला राहू नये इतक्या वरवर विचार करणाऱ्या या मानसिकतेचा समाचार घेत रंगतदार पद्धतीने हे ‘बाला’ख्यान दिग्दर्शक अमर कौशिक यांनी रंगवले आहे.

‘स्त्री’सारखा उत्तम विनोदी भयपट दिल्यानंतर लगोलग ‘बाला’सारखा पुन्हा एकदा रंजक आणि तितकीच अचूक मांडणी करणारा चित्रपट अमर कौशिक यांनी दिला आहे. शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हा मुख्य कथाविषय आहे. पण याची मांडणी करत असताना दिग्दर्शकाने चित्रपट या विषयापुरताच मर्यादित ठेवलेला नाही. मुळात अशी समस्या असणारे अनेकजण या समाजात असतील. प्रत्येकजण समस्येवर आपापल्यापरीने उत्तर शोधण्यापेक्षा केवळ गळे काढत बसेल तर तो कधीच त्या न्यूनगंडातून बाहेर पडू शकणार नाही. बाला नामक तरुणाच्या गोष्टीतून याची मांडणी करत असताना अचानक आलेल्या या न्यूनत्वातून जाणाऱ्या माणसाची कथा-व्यथा मांडून दिग्दर्शक शांत बसलेला नाही. त्याने या सगळ्याकडे बघणाऱ्या विचारसरणीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगाने सध्या समाजमाध्यमांच्या जगात केवळ आभासी क ल्पनांनाच वास्तव मानून त्यात रमणाऱ्या तरुण पिढीचेही चित्रण दिग्दर्शकाने त्याच हसतखेळत पद्धतीने केले आहे. त्यामुळे लग्नासारखा निर्णयही बाह्य़रूप बघून, खोटय़ा आनंदाच्या कल्पनांमध्ये वाहून जात घेतला जातो. आपल्याला जे जमत नाही, त्याचे खापर आपण अनेकदा दुसऱ्यांवर त्यातही आईवडिलांवर टाकून मोकळे होतो. या सगळ्या आत्मकें द्री जगण्याच्या पद्धतीमध्ये आपण आपल्या माणसांबरोबर एकत्र तर असतो, मात्र तो आपलेपणा कधीच वाटून घेता येत नाही. एकूणच आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा घटनांचे टिक टॉक करत करत लाइक्समागे पळणाऱ्या तरुणाईची मानसिकता दिग्दर्शकाने यात अचूक पकडली आहे. त्यामुळेच की काय हा चित्रपट केवळ अचानक टक्कल पडलेल्या तरुणाच्या गोष्टीपुरता मर्यादित राहत नाही. तो अनेक विषयांना स्पर्श करत पुढे जातो.

एरव्ही असा विषय रंगवताना अनेकदा तो बीभत्स किंवा अतिरंजक होईल की काय अशी भीती असते. नाहीतर अगदीच सरळसोट, उपदेशपर पद्धतीने तरी जाणारा असतो. मात्र या दोन्हीला फाटा देत अत्यंत हलक्याफुलक्या, मनोरंजक पद्धतीने हा विषय मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. इथे रंगाने काळी असण्याचे वास्तव स्वीकारत अत्यंत हुशारीने, ठामपणे पुढे जाणारी लतिकासारखी (भूमी पेडणेकर) तरुणी आहे. तर त्याचवेळी आपल्या कल्पनांमध्येच रमलेला, हुशार, स्वकेंद्री पण आपल्याबाबतीतले वास्तव न पचवता आल्याने गोंधळात पडलेला बालाही (आयुषमान खुराणा) दिसतो. तर आपल्याकडे केवळ सौंदर्य आहे हे लक्षात घेऊन त्यावरच लक्ष केंद्रित केलेली टिक टॉक स्टार परीही (यामी गौतम)आहे. तिघेही थोडय़ाफार फरकाने एकाच आर्थिक स्तरात किंवा समाजात वावरलेले आहेत. त्यामुळे कानपूरसारख्या शहरातील गल्ली, तिथली संस्कृती, मध्यमवर्गीय समाज, तिथल्या तरुणांची मानसिकता, तरुणांवर असलेला हिंदी चित्रपट आणि कलाकारांचा प्रभाव अशा अनेक गोष्टी चित्रपटात अफलातून रंगवण्यात आलेल्या आहेत. याला अर्थातच, आयुषमान खुराणा, भूमी पेडणेकर या दोन तगडय़ा कलाकारांबरोबरच सौरभ शुक्ला, सीमा पहावा, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी अगदी विहानच्या भूमिकेतील धीरेंद्र कुमार या नव्या-जुन्या कलाकारांच्या अभिनयाची साथ मिळाली असल्याने अभिनयाच्या दृष्टीने हा चित्रपट पर्वणी ठरला आहे. निरेन भट्ट यांची उत्तम पटकथा, चटपटीत संवाद, अभिनय, दिग्दर्शन अशी अफलातून मांडणी असलेले हे ‘बाला’ख्यान हसता हसता विचार करायला लावणारे आहे.

* दिग्दर्शक – अमर कौशिक

* कलाकार – आयुषमान खुराणा, भूमी पेडणेकर, यामी गौतम, सौरभ शुक्ला, सीमा पहावा, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी, धीरेंद्र कुमार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 12:11 am

Web Title: bala hindi movie review abn 97
Next Stories
1 शिवरायांचा इतिहास, गडकिल्ले व मराठी भाषेसंदर्भात ‘फत्तेशिकस्त’च्या टीमशी गप्पा
2 पहिल्या पत्नीबाबत सैफने केला मोठा खुलासा
3 ५० व्या ‘इफ्फी’मध्ये स्मिता तांबेच्या या चित्रपटाची वर्णी
Just Now!
X