करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योग पार ठप्पच झाला आहे. परिणामी चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. अशीच बिकट परिस्थिती ‘नागिन’, ‘कुमकुम भाग्य’, ‘कसौटी ज़िन्दगी की 2’, ‘कुंडली भाग्य’, यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची झाली आहे. या कलाकारांना त्यांच्या कामाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. परिणामी ही मंडळी आर्थिक संकटात सापडली आहेत.

एकता कपूरच्या बालाजी प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आज तकला दिलेल्या मुलाखतीत कलाकार आणि कर्मचाऱ्यांच्या बिकट परिस्थितीचा उल्लेख केला. “गेल्या तीन महिन्यांपासून कुठल्याही कर्मचाऱ्याला पगार मिळालेला नाही. सध्या आमची मॅनेजमेंटसोबत चर्चा सुरु आहे. जर आमच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. स्पॉट बॉय, लाईटमन, स्टेज आर्टिस्ट, सेटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट आहे. तसेच ‘नागिन’, ‘कुमकुम भाग्य’, ‘कसौटी ज़िन्दगी की 2’, ‘कुंडली भाग्य’ या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनाही त्यांच्या कामाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.” असा अनुभव त्या कर्मचाऱ्याने सांगितला.

सरकार आता हळुहळू लॉकडाउन उठवण्याच्या दिशेने पावलं उचलत आहे. नियमांचे पालन करुन चित्रीकरणासाठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र पैसे न मिळालेले कलाकार व कर्मचारी मोफत काम करण्यासाठी पुन्हा परततील का? असा एक मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.