तरुणाईच्या टेक्नोसेव्हीपणामुळे नात्यांचे ‘रेशमी’ बंध आता मानवनिर्मित ‘नायलॉन’चे धागे झाल्याचे एका हृद्यस्पर्शी कथानकातून  ‘बंध नायलॉन’चे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्वत:ची स्वप्ने साकार करण्यासाठी नात्यांना झिडकारणारा एक तरुण.. त्याची स्वप्नपूर्ती झाल्यानंतरही मुलीच्या समाधानासाठी खोटी नाती उभारून मिळवू इच्छिणारे सुख आणि त्यातून खऱया नात्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देणारे काही प्रसंग, अशी थेट भावनेला भिडणारी कथा ‘बंध नायलॉन’ची असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते.  अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिलेल्या ‘बंध  नायलॉनचे’ या एकांकिकेवरील हा चित्रपट आहे. चित्रपटातील भूमिकांमध्ये सुबोध भावे हा केंद्रस्थानी असून, महेश मांजेरकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, सुबोध भावे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे, प्रांजळ परब यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.  कोकण, सासवड यासारख्या नयनरम्य ठिकाणी सिनेमाचे चित्रीकरणाने या सिनेमातील व्यक्तीरेखात आपलेच कुटुंब प्रेक्षकांना पाहता येईल. सिनेमाला अमितराज याचे संगीत आणि मंदार चोळकर आणि सचिन पाठक यांनी मिळून सिनेमाची गाणी लिहिली आहेत.  शिरीष देसाई यांनी छायाचित्रीकरण केले असून मोहित टाकळकर यांनी सिनेमाचे  संकलन केले आहे. नातेसंबंधावर आधारित असलेला हा सिनेमा २९ जानेवारीत प्रदर्शित होणार आहे.