असिफ बागवान

कलाकार कोणताही असो, कोणत्याही कलेची उपासना तो करत असला तरी काही गुण त्याच्यात असावेत लागतात. विनम्रता, सतत शिकण्याची वृत्ती, कलेबद्दल समर्पण भावना हे गुण असलेला कलाकारच त्या कलेला उत्तम न्याय देऊ शकतो; पण दुर्दैवाने कलेतील कसब अनेक कलाकारांना या तिन्ही गुणांपासून दूर घेऊन जाते. आपल्या कलाकौशल्याबद्दल निर्माण होणारा अहंकार विनम्रतेला तिलांजली देतो आणि मग हा अहंकारच त्या कलाकारातील जिज्ञासू वृत्ती आणि समर्पण भावनाही खाक करून टाकतो. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘कटय़ार काळजात घुसली’मध्ये खाँसाहेबाच्या बाबतीत तेच घडतं. स्वत:च्या गायकीचा, घराण्याचा अहंकार खाँसाहेबाच्या मनात पंडितजींबद्दल ईर्षां निर्माण करतो तेव्हाच खरं तर त्याच्यातील कलेचा भाव संपलेला असतो. ते उलगडून दाखवण्याचं काम सदाशिव करतो. सुमधुर आणि स्वर्गीय अनुभूती देणाऱ्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कडवा कंगोरा उघड करणाऱ्या ‘कटय़ार’सारखीच बैठक असलेली आणि तसाच माहोल निर्माण करणारी, मात्र त्याहून बऱ्यापैकी वेगळी अशी एक वेबसीरिज अ‍ॅमेझॉन प्राइमवर आली आहे ‘बंदिश बॅण्डिट्स’. वेबसीरिजच्या ठरावीक, मसालेबाज, थरार कथानकांपासून अलग आणि संगीतमय अशी ही वेबसीरिज एक उत्तम दृश्यानुभव आहे.

‘बंदिश बॅण्डिट्स’ ही दोन राधेमोहन राठोडची गोष्ट आहे. त्यापैकी मोठे- पंडित राधेमोहन राठोड (नसीरुद्दीन शहा) हे जोधपूर संस्थानाचे संगीतसम्राट आहेत. आपल्या राठोड गायक घराण्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे आणि त्याचबरोबर शास्त्रीय गायनाचे पावित्र्य आणि संस्कार अभेद्य राहावे, याबाबतही ते कमालीचे आग्रही आहेत. या भूमिकेपोटीच ते आपल्या दोन्ही मुलांनाही त्याच शिस्तीत वाढवतात. दुसरा राधेमोहन (रित्विक भौमिक) हा पंडितजींचा नातू. आपल्या घराण्याचे नाव आणि वारसा हाच राखेल, या भावनेने पंडितजींनीच त्याचे नाव स्वत:च्या नावावरून ठेवले आहे. राधेही पंडितजींची गायकी आणि शिस्त या दोन्हींनी भारून गेलेला आहे. त्यांनी आपले गुरुत्व स्वीकारावे, यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी आहे. मात्र त्याचा विनम्र स्वभाव त्याला त्याचे वडील, मित्र यांच्या आग्रहाविरोधात जाण्यास भाग पाडतो आणि तिथून ही गोष्ट सुरू होते. पंडितजींच्या लेखी अजूनही कच्चा असलेल्या राधेच्या गायकीची चाहती बनलेली पॉप सिंगर तमन्ना (श्रेया चौधरी) त्याला वेगळय़ाच वाटेवर घेऊन जाते. राधेही तमन्नाच्या प्रेमाखातर आणि आर्थिक मोबदल्यासाठी ती वाट स्वीकारतो; पण त्याच वेळी पंडितजींचे शिष्यत्वही पटकावतो. परस्परविरोधी अशा या दोन्ही मार्गावर हेलपाटे मारताना होणारी राधेची दमछाक, त्यातून घडणारे विविध भावप्रसंग, त्यातूनच कथानकाला फुटणारे फाटे आणि या दोन्ही टोकांच्या संगीताचे मिश्रण हे सगळे आपल्याला या वेबसीरिजच्या सुरुवातीच्या पाचेक भागांत अनुभवयाला मिळते. त्यापुढील भागांत हे कथानक मोठे वळण घेऊन एका वेगळय़ाच मार्गावर येते. अर्थात येथेही राधेची धावपळ, त्यातून घडणारे प्रसंग आणि संगीत यांची साथ आहेच. या सर्वातून दहाएक भागांची एक चांगली, दर्जेदार वेबसीरिज प्रेक्षकांच्या वाटय़ाला येते.

ही गोष्ट राधेमोहन राठोड या पात्रांभोवती फिरत असली तरी, त्या परिघांत अनेक पात्रांची प्रभावी छोटी वर्तुळेही आहेत. तरुण पिढीला भावणारे आणि झटपट लोकप्रिय बनवणाऱ्या संगीताची स्ट्रीमिंग स्टार तमन्ना, छोटय़ा राधेचे वडील राजेंद्र (राजेश तेलंग), काका देवेंद्र (अमित मिस्त्री) या तिघांच्या रूपात ही कथा मूळ कथासूत्राचे वेगवेगळे पैलू उलगडते. स्वरचित संगीताबद्दल कमालीचा आत्मविश्वास असलेल्या तमन्नाचा गायकी सोडण्यापर्यंतचा प्रवास यातून दिसतो. तसाच आत्मविश्वास गमावल्यामुळे संगीतापासून पूर्णपणे दुरावलेल्या राजेंद्रची आर्थिक विवंचनेमुळे आलेली हतबलताही यातून दिसते. व्हायोलिन आणि सारंगीचे मिश्रण असलेले देवेंद्रचे देवलिन हे वाद्य त्याच्यातील बंडखोरी दाखवतेच; पण प्रसंगी या बंडखोरपणाच्या विरुद्ध असलेला हळुवार स्वभावही उलगडते. या तिन्ही उपकथांशिवाय राधेची आई मोहिनी (शिबा चढ्ढा) आणि सावत्र काका दिविजय (अतुल कुलकर्णी) यांच्या संगीताची गोष्ट ही मूळ कथानकाला अधिक प्रभावी करते. एकमेकांत गुंतल्या असल्या तरी या प्रत्येक कथेचा स्वतंत्र सूर आपल्याला स्पष्ट ऐकू येतो, दिसतो.

संगीत हे या वेबसीरिजचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. मुळात बव्हंशी वेबसीरिजमध्ये संगीत हे केवळ पडद्यावरच्या प्रसंगाची परिणामकता वाढवण्यासाठीच असते; पण इथे पूर्णवेळ पडद्यावर संगीतच दिसते. शंकर, एहसान, रॉय या प्रसिद्ध संगीतकार त्रिमूर्तीने ‘बंदिश बॅण्डिट’मधील पॉप आणि शास्त्रीय संगीताची जुगलबंदी अतिशय प्रभावीपणे रंगवली आहे. त्यामुळे ‘बंदिश’डम्मधील प्रत्येक गाणं वारंवार ऐकावंसं वाटतं. एकाच वेळी या दोन्ही टोकांच्या संगीत प्रकारांना या त्रिमूर्तीने सारखाच न्याय दिला आहे. शास्त्रीय संगीताच्या सुरावटी ऐकताना सहज हरवून जायला होतं, तर पॉप अल्बमच्या ठेक्यावर थिरकण्याची इच्छाही होते. या संगीताला शंकर महादेवन, पं. अजोय चक्रवर्ती, जावेद अली, शिवम महादेवन, अरमान मलिक, जोनिता गांधी या गायकांनी आपल्या स्वरांनिशी वरच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे ही वेबसीरिज पाहिल्यानंतर तिचे संगीत वारंवार ऐकावेसे वाटत राहते.

या वेबसीरिजला अधिक दृश्यसमृद्ध करणाऱ्या छायाचित्रणाचाही उल्लेख करायलाच हवा. राजस्थान हे राजवाडे, महाल, किल्ले आणि रंगीबेरंगी संस्कृतीचे मिश्रण असलेली भूमी आहे. त्या भूमीत साकारलेल्या या वेबसीरिजमध्ये तो ‘फ्लेव्हर’’ पुरेपूर आलेला आहे. यातील हवाई चित्रण आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वाजणारे संगीत पाहणाऱ्याला मनाने त्या भूमीवर घेऊन जातात, किंबहुना त्यामुळेही हे कथानक अधिक प्रभावीपणे काळजात घुसतं.