आजच्या तरुण पिढीमध्ये लग्नाविषयी नकारात्मक दृष्टिकोन असतो. यशराज फिल्म्सच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘बेफिक्रे’ या चित्रपटांतही तो दिसतो. चित्रपट कम मालिका अशा ‘बँग बाजा बारात’मध्येही तो आहे!

विषय आणि आशय दोन्ही जुनेच, पात्रेही जुनीच, पण विषयाची आणि पात्रांची मांडणी संपूर्णपणे आजच्या काळातील आहे. ही ट्रीटमेण्ट मिळालेली ‘बँग बाजा बारात’ ही वेब सीरिज सध्या गाजतेय. काळ बदलला, आजूबाजूच्या गोष्टीही बदलल्यात. तंत्रज्ञान आले. आणि त्याचा प्रभाव फक्त यंत्रांवरच नाही तर मानवी नातेसंबंधांवरही पडू लागला. काळानुसार नात्याचे पैलू, खोली, क्षितिज, बंदिस्तता, मोकळेपणा आणि मुख्य म्हणजे ठिसूळता आणि लवचीकता या सर्वावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होत ते आता काहीशे ‘व्हलनरेबल’ झालेत. यात मुख्य आणि सर्वात जास्त परिणाम होतो तो प्रियकर आणि प्रेयसी, नवरा आणि बायको या प्रेमी जोडप्यांच्या नात्यांवर. या नात्याचे आधीच मापदंड, अपेक्षा, पॅरामीटर्स, रक्ताच्या इतर ‘इनबिल्ट’ नात्यांपेक्षा वेगळे असतातच. हे नेहमी सॉफ्ट टार्गेट असतात. त्यामुळे यांच्यावर पहिला परिणाम होतो. बऱ्याचदा नकारात्मक. अशाच नात्यांचा प्रवास दर्शवला आहे वाय फिल्म्सच्या ‘बँग बाजा बारात’ या हिट वेब सीरिजने!
पूर्वी यूटय़ूबवरील छोटय़ा मूव्हीज, वेब सीरिज म्हणजे कमी बजेट असलेले, दुय्यम दर्जाची निर्मिती असलेले समजले जायचे. आता मात्र तरुण प्रेक्षक छोटय़ा पडद्यावरून संगणकाच्या आणि हातातील स्मार्ट फोनच्या स्क्रीनकडे सरकलाय हे चाणाक्ष निर्मात्यांनी ओळखलंय. त्याचबरोबर मोठय़ा पडद्यावर ‘पेहलाज’चा नाइलाज असतो म्हणून चाकोरीबाहेरील काहीही दाखवता वा बोलता येत नाही. पण वेब सीरिज हे नेटीसोड्स असल्याने इथे मोकळेपणाने वावरता येतं. कशाचाही पेहलाज, परहेज नसतोच. म्हणून आदित्य चोप्रा, यशराज फिल्म्स या त्यांच्याच वाय फिल्म्स या नव्या कंपनीद्वारे वेब सीरिज निर्मिती क्षेत्रात उतरले. ‘बँग बाजा बारात’ या वेब सीरिजची निर्मिती केली. ‘बँड बाजा बारात’ हा यशराज प्रॉडक्शन हाऊसचाच यशस्वी चित्रपट होता. त्यामुळे याच नावावरून ‘बँग बाजा बारात’ ही वेब सीरिज आणली.

आनंद तिवारी आणि प्रफुल व्यासने यातील संवाद लिहिले असून आनंद तिवारी या स्ट्रीट स्मार्ट अभिनेत्याने आणि दिग्दर्शकाने या सीरिजचे दिगदर्शन केले आहे. आनंद तिवारी या गुणवान अभिनेत्याला ‘गो गोवा गॉन’, ‘फाइंडिंग फॅनी’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ इ. हिंदी चित्रपटांमधून छोटय़ा भूमिका करताना पहिले आहेच. पण वेब सीरिज माध्यमाद्वारे प्रफुल व्यासप्रमाणे त्याने त्याच्यातील इतर गुणही जगासमोर प्रकट केले आहेत.

‘बँग बाजा बारात’ ही मालिका वाय फिल्म्सची असल्याने अली फझल, रजित कपूर, शेरनाज पटेल इ. हिंदी चित्रपटातील नियमित कलाकार यात आहेतच. ही गोष्ट आहे कानपूरच्या पवन शर्मा आणि अतिश्रीमंत, घटस्फोट झालेल्या, मोकळ्या विचारांच्या आईवडिलांची मुलगी शहाना अरोरा यांच्या लग्नाची. हे दोघे सुरुवातीला एकमेकांच्या प्रेमात चिंब भिजलेले असतात. पण प्रेमात चिंब भिजणं आणि प्रेम खोलपर्यंत रुजणं यात फरक असतो. पवन शर्मा म्हणजेच अली फझल मुंबईला येऊन मोकळ्या विचारांचा, हाय सोसायटीच्या चालीरीती, विचारप्रक्रियेशी प्रयत्नपूर्वक एकरूप झालेला, पण आतून अजूनही कानपुरीयाच असलेला आणि शहानावर मनापासून प्रेम करणारा असतो.

पहिल्याच दृश्यात ‘तुम मुझे जिंदगीभर इतना ही प्यार करोगे ना!’ हे प्रत्येक लव्ह बर्ड्सने चावून चोथा झालेलं वाक्यं येतं. प्रॉमिसेस न मागता ‘तुम हर रात सोने से पहले ब्रश करोगे, और दाल चावल हात से नही खाओगे..’ असं प्रॉमिस शहाना पवनला करायला लावते. दोघेही लिव्ह इनमध्ये राहिल्यावर लग्न करायचं ठरवतात. पण लग्न मात्र दोघांच्याही आईवडिलांच्या, कुटुंबीयांच्या, नातेवाईक, समाजाच्या साक्षीने अशीर्वादानेच करायचं हा त्यांचा निर्णय असतो. तीन दिवसांत दोघेही मुंबईत हॉटेलमध्ये लग्न ठरवतात. सर्व तयारी होते आणि आपापल्या आई-वडिलांना बोलावतात. पवनची आई अगदी जुन्या, ठरावीक पारंपरिक उत्तर प्रदेशीय विचारांची, आक्रमक, मुलाबाबत खूप पझेसिव्ह, तर वडील घरात दुय्यम भूमिकेत, बायकोला सांभाळून घेणारे, डिफेन्सिव्ह, बॅकफुटवर असतात.

शहानाचे वडील अगदी अतिश्रीमंत, हाय सोसायटीचे असूनही आतून पुरुषी अहंकार असलेले. घटस्फोट घेऊन तरुण मुलीशी लग्न करून त्यांनाही एक छोटा मुलगा असतो. पण ते मुलीची मर्जी सांभाळणारे असतात. तर आई एकदम खुल्या मोकळ्या विचारांची पण संयत, समंजस, लेट द लाइफ ग्रो विचारांची आणि लग्नाच्या मुलीची आई असतानाही स्वत:चं वैयक्तिक आयुष्य मात्र पूर्णपणे स्वत:च्या मर्जीनुसार जगणारी आणि परिपक्व विचारांची असते. दोन कुटुंबं भेटल्यावर गमती घडू लागतात. पवनची आपल्या पारंपरिक आईची मर्जी सांभाळताना आणि होणाऱ्या बायकोसोबत सेम पेजवर येण्यासाठी, राहण्यासाठी होणारी त्याची तगमग, प्रयत्न हे लेखकाने मस्त लिहिले आणि अली फझलने साकारले आहेत.

लग्नात सारंग नावाचा फोटोग्राफर येतो तेव्हा कहानी में ट्विस्ट येतो. कारण हा सारंग शहानाचा आधीचा बॉयफ्रेण्ड आणि शहानाच्या आईचा सध्याचा बॉयफ्रेण्ड असतो. या वेब सीरिजमध्ये काही दृश्यं खूप मस्त आणि पूर्णपणे वेगळी आहेत. असंच एक दृश्य सर्व जण सोबत जेवतानाचं आहे. सारंगची ओळख शहानाच्या आईचा भाचा म्हणून केली जाते. त्या दृश्यात सर्व जण सुरुवातीला कोणीही कोणाशी बोलत नसतं. मात्र मोबाइलवर एकमेकांना मेसेजेस करीत एकमेकांशी बोलत असतात.

‘‘बेटा बहन के शादी में बहोत काम करना पडेगा! अपनी मौसी के गोद में जाके मत बैठ जाना!’’ पवनची आई हे सारंगला म्हणतानाचा विनोदी प्रसंग अप्रतिम झालाय. ‘‘व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन’’ या नव्या उक्तीप्रमाणे शहानाची स्प्लिन्स्टर पार्टी असते आणि त्याच वेळी एकीकडे पवनची आई लग्नापूर्वीचे पारंपरिक विधी हॉटेलमध्ये करण्याचा हट्ट करीत असते तेव्हाचा प्रसंग बघण्यासारखा आहे.

संपूर्णपणे रॉम कॉम प्रकारात मोडणारी ही सीरिज असूनही काही प्रसंग हृदयाला स्पर्श करणारे आहेत. पवन आणि पवनच्या वडिलांचा बोलण्याचा एक प्रसंग अगदी सर्वोत्तम, या मालिकेला उच्च स्तरावर नेणारा आहे. ‘‘बेटा रिश्ते सिर्फ जिद से चलते है’’ हे वाक्य या मालिकेचं खरं यूएसपी आहे. गजराज राव या अभिनेत्याने पवनचे वडील, आयेशा रजाने आई अगदी छान साकारली आहे. अनुष्का शर्माच्या ‘एनएच टेन’ या सिनेमात छोटय़ा भूमिकेत असलेल्या नील भूपालमनेही सारंगची भूमिका वेगळ्या पद्धतीने साकारलीय.

अली फझल ‘थ्री इडिट्स’मध्ये पहिल्यांदा दिसला होता. हा काही मर्यादा असलेला, पण गुणी कलाकार आहे. अंगिरा धर या लॅक्मे फेम मॉडेलनेही भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. एकेकाळच्या ब्योमकेश बक्षी म्हणून घराघरांत पोहोचलेल्या रजित कपूरनेही रागीट अहंकारी पंजाबी विनोदी पद्धतीने साकारला आणि त्याला या प्रकारच्या भूमिकेत बघायला मजा येते.

या मालिकेतील सर्वोत्तम आणि विविध पैलू असलेली भूमिका शेरनाज पटेलची आहे. शेरनाज पटेल, म्हणजेच ‘ब्लॅक’ सिनेमामध्ये राणी मुखर्जीच्या आईची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीने या वेब सीरिजमध्ये किसिंग सीनही केला आहे, पण तरीही तिची भूमिका कुठेही मर्यादा सोडणारी वाटत नाही. शहानाच्या आईची भूमिका ही या सीरिजची सर्वोत्तम गोष्ट आहे.

आजच्या पिढीमध्ये लग्नाविषयी एक नकारात्मक दृष्टिकोन असतो. यशराज फिल्म्सने यापूर्वीही ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘बेफिक्रे’ चित्रपटांद्वारे तो मांडला आहे. इथेही आजच्या पिढीची आजच्या काळातील बदललेली मानसिकता ते दर्शवतात. चित्रपट कम मालिका अशी ‘बँग बाजा बारात’ची मांडणी आहे!

अभिजीत पानसे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा