अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी बांगलादेशकडून इरफान खानच्या ‘डूब’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी ‘डूब : नो बेड ऑफ रोझेस’ या चित्रपटाची निवड झाली आहे . आश्चर्य म्हणजे विवादात सापडलेल्या या चित्रपटावर बांगलादेशमध्ये पूर्वी बंदी घालण्यात आली होती.

९१ व्या अॅकॅडमी अवॉर्डसाठी बांगलादेशकडून अधिकृतरित्या या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. २००२ पासून बांगलादेश ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटाच्या शर्यतीत आहे. लेखक चित्रपट निर्माते अहमद यांच्या आयुष्यावर ‘डूब’ ची कथा आधारली आहे. पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर वयानं ३३ वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीशी अहमद यांनी आपली लग्नगाठ बांधली आणि त्यांच्याच जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

भारत बांगलादेश या दोन्ही देशांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मोस्तफा फारूखी यांनी केलं आहे. इरफान खान या चित्रपटाचा सहनिर्मातादेखील आहे. या चित्रपटाची कथा वादात सापडली होती त्यामुळे बांगलादेशमध्ये या चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. पण, नंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये हा चित्रपट बांगलादेश, फ्रान्स , भारत आणि ऑस्ट्रेलियात प्रदर्शित झाला.

तर भारताकडून ‘विलेज रॉकस्टार’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. एकूण २९ चित्रपटांमधून ‘विलेज रॉकस्टार्स’ची निवड करण्यात आली आहे. हा चित्रपट जवळपास ७०हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर चार राष्ट्रीय पुरस्कार आणि ४४ इतर पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावावर केले आहेत.राजी, पद्मावत, हिचकी, ऑक्टोबर, लव सोनिया, गुलाबजाम, महानटी, पिहू, कडवी हवा, बोगदा, रेवा, बायोस्कोपवाला, मंटो, १०२ नॉट आऊट, पॅडमॅन, भयानकम, आज्जी, न्यूड, गल्ली गुलैया या चित्रपटांना मागे टाकत ‘विलेज रॉकस्टार्स’ने बाजी मारली आहे.