मुंबई, अंधेरी येथील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये ५८वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात अनुराग बसू दिग्दर्शित ‘बर्फी’ आणि सुजॉय घोष यांच्या ‘कहानी’ या चित्रपटांनी सर्वात जास्त पुरस्कार पटकावले. त्याचबरोबर जॉन अब्राहम निर्मित पहिला चित्रपट ‘विकी डोनर’ने सुद्धा पुरस्कार सोहळ्यात सर्वांचे मन जिंकले. बर्फी चित्रपटातील संगीतासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि संगीतकारचा पुरस्कार प्रीतम यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट निर्मितीकलेचा पुरस्कार याच चित्रपटासाठी रजत पोद्दार यांना मिळाला. या वर्षीसुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर अभिनेत्री विद्या बालनचे वर्चस्व राहीले. सुजॉय घोष यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर, संजय मौर्या आणि आँलविन रेगो यांना सर्वोत्कृष्ट ध्वनीनिर्मिती पुरस्काराचा मान मिळाला. ‘विकी डोनर’ चित्रपटातील डॉ.चड्डाच्या भूमिकेसाठी अभिनेते अनु कपूर यांना सर्वोत्कृष्ट सहकलाकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.