निसर्गाचा प्रकोप म्हणूया की मानवनिर्मित आपत्ती म्हणूया? ते काहीही असलं तरी सध्या आपल्यावर जे संकट ओढवलं आहे त्याचा आपल्या बुद्धीच्या कक्षा वाढवत, विज्ञानाच्या मदतीने माणूस सामना करतोच आहे. त्याने कधी खचून जातो आहे तर कधी पुन्हा नव्या जोमाने उभा राहतो आहे. एकूणच सगळीकडे खूप नकारात्मकता पसरली आहे. पण ह्या परिस्थितीला सकारात्मकतेत परावर्तित करण्यासाठी ठाणे आर्ट गिल्ड (टॅग) प्रस्तुत, सदानंद देशमुखांच्या कादंबरीवर आधारित सध्या गाजत असलेल्या ‘बारोमास’ या नाटकाची टीम पुढे सरसावली आहे.

उत्तम साहित्याचे अभिवाचन आणि त्याचा रसास्वाद हा माणसाला कितीही कठीण परिस्थितीत उभारी देऊ शकतो. हे जाणून, ठाणे आर्ट गिल्ड आणि लोकसत्ता ह्यांच्या सहकार्याने बारोमास टीम एक नवीन उपक्रम ‘२१ दुणे ४२’ घेऊन येत आहे . ह्या उपक्रमाअंतर्गत २१ दिवस रोज २ कथा ह्याप्रमाणे उत्तम दर्जेदार अश्या ४२ कथांचे अभिवाचन होणार आहे.

दय सबनीस, सचिन खेडेकर, वासंती वर्तक, मुक्ता बर्वे, जितेंद्र जोशी, मंगेश देसाई, संपदा जोगळेकर कुळकर्णी, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, हेमांगी कवी, सुप्रिया विनोद, शिल्पा तुळसकर, सागर तळाशीकर, हर्षदा बोरकर असे मान्यवर आणि सोबत ठाणे आर्ट गिल्डचे अभिवाचक सहभागी होणार आहेत. ह्या कार्यक्रमात, रत्नाकर मतकरी, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, व. पु. काळे, व्यंकटेश माडगूळकर, मंगला गोडबोले, जयवंत दळवी, डॉ.सोनाली लोहार, इरावती कर्वे, संपदा जोगळेकर कुळकर्णी, दिलीप प्रभावळकर, मेघना पेठे, किरण येले, सदानंद देशमुख अश्या अनेक उत्तमोत्तम साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेता येईल.