मेहनत करण्याची तयारी आणि ध्येयपूर्तीची जिद्द या दोन गोष्टींच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करून दाखवून शकतो हे सिद्ध केलंय भटिंडाच्या एका सामान्य बूट पॉलिश करणाऱ्या तरुणाने. सनी हिंदुस्तानी असं या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. गायनाचं कोणतंही प्रशिक्षण न घेता गाणी ऐकून स्वत: संगीत शिकलेल्या सनीने ‘इंडियन आयडॉल’चा किताब पटकावला आहे. सनीच्या घराची परिस्थिती हलाखीची होती. त्याची आई फुगे विकून घराचा गाडा चालवायची. मेहनतीच्या जोरावर सनीने त्याचं आयुष्य पालटलं आहे. ‘इंडियन आयडॉल’चा किताब जिंकल्यानंतर सनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सनीला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. मात्र कुटुंबीयांकडून त्याला साथ मिळाली नाही. वडिलांच्या निधनानंतर कर्जाचं डोंगर त्याच्यासमोर उभं होतं. वीजबिल न भरल्याने सनीचं कुटुंब कित्येक दिवस अंधारातच राहत होतं. अशा परिस्थितीतही हार न मानता सनीने चंदीगढ येथे झालेल्या ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनमध्ये भाग घेतला.

सनीने गायलेलं नुसरत फतेह अली खान यांचं ‘आफरीन आफरीन’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. हा व्हिडीओ पाहून महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सुद्धा भावूक झाले होते.

सनीला इंडियन आयडॉलची ट्रॉफी, २५ लाख रुपये, एक कार आणि टी-सीरिजसोबत गाण्याचा करार या गोष्टी बक्षीस म्हणून मिळाल्या. लातूरचा रोहित राऊत दुसऱ्या क्रमांकावर होता. सनी आणि रोहितमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र अंतिम फेरीत सनीने बाजी मारली.