रेश्मा राईकवार

बाटला हाऊस

वास्तव घटनांवर आधारित चित्रपटांची जी एक लाट सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत आहे, त्याच लाटेतला नवीन चित्रपट ‘बाटला हाऊस’ स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला आहे. १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. त्यांची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने घेतली होती. या बॉम्बस्फोटामागचे कर्तेकरविते शोधताना दिल्लीतील बाटला हाऊस परिसरात पोलिसांकडून घडलेली चकमक हा या चित्रपटाचा विषय आहे. बाटला हाऊस चकमक ही खरी आहे की खोटी, यावर अजूनही एकमत नाही. अशा वेळी त्या घटनेचे उथळ, वरवरचे चित्रण करत हा सारा प्रकार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी केला आहे.

बाटला हाऊस प्रकरण रुपेरी पडद्यावर रंगवण्यामागचा दिग्दर्शकाचा उद्देश पुरेसा स्पष्ट होत नाही. मात्र ज्या पद्धतीने चित्रपटाची सुरुवात होते, कथेची मांडणी हळूहळू स्पष्ट होते ते पाहता पोलिसांची बाजू काय होती, हे मांडण्याचा प्रयत्न वरकरणी दिसतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच भला मोठा डिस्क्लेमर प्रेक्षकांना ऐकावा लागतो. हा चित्रपट बाटला हाऊस घटनेवरून प्रेरित, पण काल्पनिक आहे, असे म्हटल्यावर दिग्दर्शकाने जे म्हटले आहे त्यात सिनेमॅटिक लिबर्टीची जास्त शक्यता निर्माण होते. चित्रपटाचा नायक डीसीपी संजीव कुमारच्या दृष्टिकोनातून ही कथा रंगवण्यात आली आहे. बाटला हाऊसमध्ये लपलेले तरुण ओखला विद्यापीठाचे विद्यार्थी असले तरी ते इंडियन मुजाहिद्दीनसाठी काम करत असल्याची टीप दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मिळते. आणि स्पेशल सेल टीम इन्स्पेक्टर के. के. वर्माच्या नेतृत्वाखाली बाटला हाऊस येथे पोहोचून हल्लाबोल करते. पोलीस आणि आतमध्ये लपलेल्या तरुणांमध्ये चकमक होऊन त्यात केके गंभीर जखमी होतो. तोवर डीसीपी संजीव तिथे पोहोचून ऑपरेशनचा ताबा घेतात. चकमकीत दोन अतिरेकी मारले जातात, एक शरण येतो तर त्यांचा म्होरक्या दिलशाद आणि त्याचा सहकारी पोलिसांसमोरून तिथून पळून जाण्यात यशस्वी होतात. या घटनेनंतर एकूणच दिल्ली पोलिसांच्या या चकमकीवर प्रश्नचिन्ह उभे राहते.

बाटला हाऊस प्रकरण एवढे चिघळते, कारण इथे केवळ दिल्ली पोलिसांवर खोटय़ा चकमकीचा आरोप लागत नाही. तर मारले गेलेले तरुण मुस्लीम अल्पसंख्याक असल्याने राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे सगळेच पोलिसांच्या विरोधात उभे ठाकतात. या सगळया अवघड परिस्थितीत बाटला हाऊसची चकमक खोटी नव्हती, पर्यायाने पोलिसांवर घेतलेला संशय खरा नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारीही पोलिसांवरच येऊन पडते. अशा वेळी आपल्या सहकाऱ्यांचे नीतीधैर्य खचता कामा नये, पोलिसांवर आलेले बालंट दूर हटले पाहिजे, कायदेशीर लढाई लढली पाहिजे आणि माध्यमांपासून ते राजकीय पक्षापर्यंत सगळ्यांना ही भूमिका पटवून देणे या सगळ्यात डीसीपी संजीव आणि त्यांचा स्पेशल सेलच नाहीतर संपूर्ण पोलीस दलाची कसोटी लागते. हा सगळा प्रकार रंगवताना जे झाले त्या पद्धतीने दाखवताना पोलिसांच्या दृष्टिकोनातूनच ही कथा पुढे गेल्यासारखी वाटते. आणि पोलिसांची बाजू न्याय्य होती हेही स्वीकारायचे झाले तरी पूर्वार्धातील बराचसा भाग हा त्याच त्याच पद्धतीने पुन्हा लोकांसमोर येत राहतो. उत्तरार्धात न्यायालयीन खटला आणि त्याअंतर्गत पोलिसांसमोर जे प्रश्न उभे केले गेले

त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. त्यामुळे अर्थातच, उत्तरार्ध जास्त चांगला झाला असला तरी एकूणच हे या घटनेचे वरवरचे चित्रण आहे हे जाणवत राहते.

अभिनेता म्हणून जॉन अब्राहमचे चित्रपट दरवेळी वेगळ्या विषयावरचे असले तरी तो त्याच साच्यातील भूमिकांमध्ये अडकतो आहे की काय असे वाटू लागले आहे. त्याच्या लूकपासून अभिनयापर्यंत सगळ्यात जाणवणारा तोचतोचपणा ‘बाटला हाऊस’मध्ये प्रकर्षांने जाणवतो. त्याच्या पत्नीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या भूमिकेची लांबी जास्त असली तरी तिला करण्यासाठी त्यात काही फार वाव मिळालेला नाही. त्यातल्या त्यात इन्स्पेक्टर केके म्हणून अभिनेता रवी किशन जास्त लक्षात राहतो, मात्र त्यांची भूमिका पहिल्या काही मिनिटांतच संपते. त्यामुळे हा सगळा डोलारा जॉन अब्राहमच्याच खांद्यावर उभा करण्यात आला आहे. निखिल अडवाणी यांनी याआधीही असे विषय दिग्दर्शित केले आहेत. विषयानुरूप अनेक मुद्दय़ावर थेट प्रकाश टाकण्याची त्यांची शैली इथेही काही प्रसंगात जाणवते. विशेषत: दिल्ली पोलीस दिलशादला पकडण्यासाठी भर सभेत पोहोचल्यानंतर त्यांच्या गाडीला अक्षरश: चिकटलेले लोक आणि त्यातून निघणे अशक्य झाल्यानंतर हतबल झालेले पोलीस, असे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत. मात्र विषय म्हणून बाटला हाऊस प्रकरण रंगवताना केवळ पोलिसांच्या या कारवाईबाबत उभ्या केलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देणे हा दिग्दर्शकाचा निश्चितच हेतू नसावा. इथे एकुणात दहशतवादी कारवायांबद्दलचीही सविस्तर मांडणी, त्यांची यामागची मानसिकता येणे अपेक्षित होते. मात्र ज्या पद्धतीने त्यांची आणि त्यांना मारणाऱ्या पोलिसांची मानसिकता या चित्रपटात दिसते, ती याआधीही अनेक चित्रपटांतून दाखवलेली असल्याने नवीन काही त्यात हाती लागत नाही. म्हणूनच की काय एका वास्तव घटनेचे वरवरचे चित्रण यापलीकडे चित्रपट आपल्याला फारसे काही देत नाही.

* दिग्दर्शक – निखिल अडवाणी

* कलाकार – जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, रवी किशन, नोरा फतेही, राजेश शर्मा, क्रांति प्रकाश झा, मनीष चौधरी.