X

..म्हणून ‘बत्ती गुल मीटर चालू’साठी शाहिदला नव्हती पहिली पसंती

'बत्ती गुल मीटर चालू' हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर सध्या दुसऱ्यांदा पिता बनल्याचा अनुभव घेत असून त्याचा आगामी ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून वीजचोरीच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिदबरोबर अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून शाहिदपूर्वी या चित्रपटासाठी अन्य दोन अभिनेत्यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. चित्रपटाचे लेखक विपुल रावल यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

‘या चित्रपटासाठी अभिनेता इमरान खान आणि जॉन अब्राहम यांच्या नावाला पसंती देण्यात आली होती. प्रथम मला या चित्रपटाची कथा सुचली. या चित्रपटाची कथा सुचल्यानंतर मी इमरानकडे गेलो होतो. मात्र त्याच्या व्यस्त शेड्युलमुळे त्याने या चित्रपटासाठी नकार दिला’, असं विपुल यांनी सांगितलं.

पुढे ते असंही म्हणाले, ‘इमरानने नकार दिल्यानंतर जॉन अब्राहम या भूमिकेला न्याय देऊ शकतो असं आम्हाला वाटलं होतं. त्यामुळे आम्ही जॉनलाही या चित्रपटासाठी विचारणा केली. मात्र त्यावेळी जॉन ‘परमाणु’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होता. या दोन्ही कलाकारांनी नकार दिल्यानंतर आम्ही शाहिद कपूरला या चित्रपटाविषयी विचारलं आणि शाहिदने चित्रपटासाठी होकार दिला’.

दरम्यान, हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यामध्ये शाहिदबरोबर श्रद्धा कपूर, सुधीर पांडे, सुप्रिया पिळगावकर, यामी गौतम यांच्याही भूमिका आहेत.

 

Outbrain

Show comments