रेश्मा राईकवार

बत्ती गुल मीटर चालू

सतत जाणारी वीज आणि भरमसाट वीज बिलांचा संबंध जुळवता जुळवता प्रेमाचा मीटर कधी सुरू होतो तेच कळत नाही. हा प्रेमाचा मीटर संपत नाही पण काही क्षणांसाठी अडकतो तेव्हा त्या गुल झालेल्या विजेचा शोध नायक सुरू करतो. आणि प्रेक्षकांना आता खरा चित्रपट पाहायला मिळणार असे वाटत असतानाच पुन्हा कथा टिपिकल कोर्टरूम ड्रामामध्ये अडकतो. खरे तर लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि ज्यावर कित्येक र्वष झगडूनही उत्तरे मिळालेली नाहीत असा विषय असतानाही श्री हरी नाराण सिंग दिग्दर्शित ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटात मनोरंजनाशिवाय फार काही हाती लागत नाही.

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट अनपेक्षितरीत्या आला. घरोघरी शौचालय हवेत, ही गरज खरी. त्यासाठी वर्षांनुर्वष सरकारी स्तरावर प्रचार सुरू आहे. मात्र श्री हरी नारायण सिंग दिग्दर्शित ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटात केवळ प्रचारकी थाटात न बोलता जनसामान्यांची दैनंदिन गरज आणि तीही पूर्ण होत नाही तेव्हा त्यातून पसरणारी अस्वस्थता, रोगराई या गोष्टी प्रकर्षांने मांडणारा ठरला होता. त्यामुळे ‘बत्ती गुल मीटर चालू’ या दुसऱ्याच चित्रपटातही नावातच विषय थेट असल्याने तितक्याच सरळपणे या विषयाला दिग्दर्शकाने हात घातला असेल, अशी अटकळ होती. मात्र इथे चित्रपट सुरू होतो तो तीन मित्रांच्या गोष्टीने. एसके (शाहीद कपूर), सुंदर (दिव्येंदू शर्मा) आणि नॉटी (श्रद्धा कपूर) या तिघांचीही लहानपणीपासून घट्ट मैत्री आहे. वकिली शिक्षणाच्या बळावर छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांना त्यांच्या जाहिरातींवरून कायदेशीर धाकात घेत पैसे उकळणारा एसके, प्रामाणिकपणे आपला व्यवसाय उभा करणारा साधासरळ सुंदर आणि फॅ शन डिझायनर होण्याचे स्वप्न पाहणारी नॉटी ही तिकडी सुखाने नांदते आहे. मात्र नॉटी जेव्हा जोडीदार म्हणून सुंदरची निवड करते तेव्हा या मैत्रीला गालबोट लागते. बाकी उत्तराखंडातील गावात राहणाऱ्या या तिघांच्या रोजच्या जगण्यातू सतत जाणाऱ्या विजेचा आणि जनरेटर्सवर जगणाऱ्या घराघरांतील संभाषणातून आपल्याला तिथल्या वीजसमस्येची व्याप्ती कळते. भारनियमन ही समस्या असली तरी भरमसाट येणारी वीज बिले आणि त्यातून वीज कंपन्यांनी पैसे उकळण्याचे चालवलेले रॅकेट आपल्यासमोर येण्यासाठी प्रेमत्रिकोणाचा भंग व्हावा लागतो. या सगळ्या प्रकारात चित्रपट भरपूर ताणला गेला आहे आणि या ताणातूनही मुळ मुद्दा फक्त मनोरंजक पद्धतीने दिसतो.

सर्वसामान्यांची समस्या ही त्यामुळे होणाऱ्या परिणामातून, त्यांच्या भवतालातून, रोजच्या गोष्टीतून यायला हवी. कथेच्या अनुषंगाने मग त्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्यातली नाती या गोष्टी आल्या तर मूळ विषय अधोरेखित होतो. इथे नेमकी उलट मांडणी होते. तीन व्यक्तिरेखांची मैत्री आणि त्यांची प्रेमकथाच इतकी मोठी झाली आहे की मूळ मुद्दा सुरू होईपर्यंत आपण नेमके  काय पाहतो आहोत हेच प्रेक्षक विसरून जातो. चित्रपटाचा पूर्वार्ध प्रेमकथेत तर उत्तरार्ध हा तितक्याच रंजक कोर्टरूम ड्रामामध्ये संपतो. या कोर्टरूम ड्रामाच्या निमित्ताने का होईना वीज नसली तरी टिकटिकत राहणाऱ्या मीटरमधून होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात, अजूनही अंधारात असलेल्या गावांबद्दल मार्मिक टीकाटिप्पणी केली आहे. बाकी व्यक्तिरेखांची मांडणी, उत्तराखंडची भाषा, तिथले निसर्गसौंदर्य, गंगेची आरती, बोलण्याची ढब हे सगळे दिग्दर्शकाने अचूक टिपले आहेत. याशिवाय मांडणीसाठी म्हणून का होईना कल्याण आणि विकासची केलेली प्रतीकात्मक योजना थोडी वेगळी आहे. कलाकारांनी त्यांना दिलेल्या भूमिका उत्तम पार पाडल्या आहेत.

गाणी आणि शाहीद-श्रद्धाचे नृत्य दोन गाण्यांपुरती का होईना त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळते. शाहीदने आपल्या नेहमीच्या शैलीत एसके वठवला आहे. त्याला हिरोगिरीला पुरेपूर वाव मिळाला आहे. दिव्येंदूचा सुंदरही तितकाच अप्रतिम आणि श्रद्धाची नॉटीही तितकीच रंगीबेरंगी व्यक्तिमत्त्व असलेली पाहायला मिळते. तिथला उच्चारांमधला हेल पकडायला शाहीद आणि श्रद्धाला करावी लागलेली मेहनत दिसून येते. या दोघांचेही सुरुवातीचे संवाद हे पाठ केल्यासारखे येतात. मात्र या दोघांबरोबरच फरीदा जलाल, अतुल श्रीवास्तव, सुश्मिता मुखर्जी या कलाकारांनी छोटय़ा भूमिकांमध्ये का होईना आपली छाप उमटवली आहे. अर्थात, जो मूळ विषय आहे तो रंजक पद्धतीने आला असला तरी त्याचा मीटर अधिक असता तर जास्त प्रकाश पडला असता.

* दिग्दर्शक – श्री हरी नारायण सिंग

* कलाकार – शाहीद कपूर, श्रद्धा कपूर, दिव्येंदू शर्मा, यामी गौतम, फरीदा जलाल, सुप्रिया पिळगावकर, अतुल श्रीवास्तव, सुश्मिता मुखर्जी.