ऐतिहासिक चित्रपट ही कायम पर्वणी असते, पण त्यातही युद्धपट पाहायला मिळणे ही मोठी अवघड गोष्ट. या पाश्र्वभूमीवर ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शनात हातोटी असलेल्या आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत – द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. मुळात, गोवारीकर खूप काळाने पुन्हा एकदा ऐतिहासिक पट घेऊन येत आहेत, हीच त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी गोष्ट आहे. त्यात अटकेपार पोहोचलेल्या मराठय़ांनी लढलेल्या सर्वात मोठय़ा लढाईची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार असल्याने एकीकडे या चित्रपटाबद्दल उत्सुकताही आहे. तर दुसरीकडे या चित्रपटात सदाशिवराव भाऊंच्या व्यक्तिरेखेला अर्जुन कपूर किती न्याय देऊ शकेल, यावरून समाजमाध्यमांवर चर्चेलाही उधाण आले आहे.

चित्रपटाच्या विषयानुसार त्याचा अभ्यास-संशोधन करून तो मांडण्यावर भर देणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटासाठी जवळपास दीड वर्ष केवळ पटकथेवर काम केले आहे. मराठे आणि अफगाण शासक अमहदशाह अब्दाली यांच्यात पानिपतमध्ये लढल्या गेलेल्या या युद्धाची कथा ही केवळ रणभूमीपुरती मर्यादित नाही. त्यानिमित्ताने, नानासाहेब पेशवे, पानिपतवर लढल्या गेलेल्या या युद्धाचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, इब्राहीम गारदी अशा अनेक व्यक्तिरेखा आणि त्यांच्या गोष्टीही त्या ओघात येतात. पेशवाईतील अंतर्गत राजकारण, त्याचा मराठेशाहीला बसलेला फटका एकीकडे.. युद्धात सदाशिवराव भाऊंचं कोय झालं इथपासून अनेक दंतकथा वर्षांनुवर्ष पानिपतावर १७६१ साली लढल्या गेलेल्या या तिसऱ्या युद्धाबद्दलचे कुतूहल वाढवत आल्या आहेत. यातलं नेमकं काय-काय गोवारीकरांच्या ‘पानिपत’मध्ये दिसणार?, याबद्दल अजून फारसा उलगडा चित्रपटकर्त्यांनी होऊ दिलेला नाही. सध्या तरी जो चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे त्यात तलवारींच्या खणखणाटासह लढणारे शूर मराठे, अहमदशाह अब्दालीच्या भूमिकेत लक्ष वेधून घेणारा अभिनेता संजय दत्त, पार्वतीबाईच्या भूमिकेत क्रिती सनन आणि सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेतील अर्जुन कपूर हे मुख्य चेहरे दिसत आहेत. याशिवाय, चित्रपटात नानासाहेबांची भूमिका अभिनेता मोहनीश बहल यांनी केली आहे. मोहनीश बहल यांनाही खूप काळानंतर रुपेरी पडद्यावर ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना पाहण्याची संधी हा चित्रपट देणार आहे. गोपिकाबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात परतल्या आहेत. अभिनेत्री झीनत अमानही छोटोखानी भूमिकेत चित्रपटात दिसणार आहे.

मुळात, चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अर्जुन कपूर मराठीतील संवाद म्हणू शकेल का? क्रिती सनन पार्वतीबाईंची मराठमोळी भूमिका साकारू शकली असेल का?, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उभे राहिले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रकाशन निवडक माध्यमांसमोर करण्यात आले, त्यानिमित्ताने या कलाकारांशी संवाद साधला असताना चित्रपटासाठी विचारणा झाल्यानंतर मुळात त्यांच्याही मनात पहिल्यांदा हे प्रश्न उभे राहिले होते, अशी प्रत्येकाने भावना व्यक्त केली. त्यातल्या त्यात अर्जुन कपूर मुंबईतच लहानाचा मोठा झाला असल्याने, त्याने आपल्याला चांगलं मराठी बोलता येतं आणि समजतंही असं सांगितलं. हा चित्रपट करत असताना त्याला मोठी भीती वाटली होती ती संजय दत्तसमोर उभं राहण्याची.. मात्र कलाकार कोणतेही असोत आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शनाची शैलीच अशी आहे की, प्रत्येकाने आपापलं काम त्यांच्या सूचनेनुसार चोख बजावलं आहे, असं मत अर्जुनच नाही तर संजय दत्तनेही व्यक्त केलं. कारण, इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत संजय दत्तने कधीच ऐतिहासिक भूमिका केली नव्हती. आजवर मला तशी भूमिका का मिळाली नाही, याचा मी विचार नाही केला. पण याआधी अशी भूमिका मिळाली असती, तर आणखी  मजा आली असती, असं मतही त्याने व्यक्त केलं. अर्थातच, पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारत असल्याने दिग्दर्शक जे सांगेल त्याचपद्धतीने करायचं हे अगदी काटेकोरपणे अवलंबलं असल्याचंही त्याने कबूल केलं.

क्रिती सनन ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. नटखट भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रितीनेही पंजाबी असताना मी एका मराठमोळ्या मुलीची त्यातही पार्वतीबाईंची भूमिका करू शकेन, असं का वाटलं?, हाच प्रश्न गोवारीकरांना केला होता, असं सांगितलं. पानिपतसारखा विषय ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचा आहेच, पण ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, अशी आहे. त्या अर्थाने हा चित्रपट आणि यातली भूमिका दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे दिग्दर्शकावर विश्वास ठेवून आपणही या चित्रपटाची तयारी केल्याचे क्रितीने स्पष्ट केले. खुद्द दिग्दर्शक म्हणून आशुतोष गोवारीकर यांचा या चित्रपटामागचा अभ्यास, विचार, चित्रीकरणासाठीची पूर्वतयारी आणि चित्रीकरणादरम्यानचे किस्से अशा अनेक गोष्टी तूर्तास गुलदस्त्यात आहेत. त्या हळूहळू उलगडत जातील, सध्या तरी या चित्रपटाच्या ट्रेलरवरून चर्चेचे चांगलेच धुमशान समाजमाध्यमांवर रंगले आहे. दुसरीकडे नेहमीप्रमाणे ऐतिहासिक चित्रपटांना काही ना काही वादाला सामोरं जावं लागतंच तसं याही चित्रपटाला अहमदशाह अब्दाली याच्या व्यक्तिरेखेवरून खुद्द अफगाणिस्तानी दूतावासाने धारेवर धरलं आहे. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत अजूनही काही वाद, चर्चेला तोंड फुटेलच.. पण मराठेशाहीच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातलं रक्तरंजित तरीही तितकंच नाटय़मय असं महत्त्वाचं पान रुपेरी पडद्यावर उलगडणार असल्याने ‘पानिपत’ हा चित्रपटही महत्त्वाचा ठरणार आहे.