‘बेवॉच’ मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री एंजेलिका ब्रिजेस आता उत्पन्नासाठी हॉलीवूड सिनेसृष्टीवर अवलंबून नाही. १९९५ साली ‘डेज ऑफ आर लाईव्ह’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या एंजेलिकाने पुढे ‘व्हरोनिका मार्स’, ‘द बोल्ड अँड द ब्युटिफुल’, ‘द मिस्ट्री मेन’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. परंतु जसजसे वय वाढत गेले तसतसे तिला मिळणाऱ्या कामात घट होत गेली. परिणामी उत्पन्नासाठी तिने पाळीव प्राण्यांना सांभाळण्याचा व्यवसाय सुरू केला. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात असणाऱ्या एंजेलिकावर एका व्यक्तीने त्याच्या श्वानाची हत्या केल्याचा आरोप लावला. त्यासंदर्भात त्याने कायदेशीर पोलीस तक्रार केली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून एंजेलिकाला अटक केली, परंतु तिच्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे न सापडल्यामुळे तिला जामिनावर सोडण्यात आले.

सहा महिन्यांपूर्वी आपल्या लाडक्या स्नूपी नामक कुत्रीला घेऊन एक व्यक्ती एंजेलिकाच्या दुकानात आला. पुढे इतर पाळीव प्राण्यांबरोबर तिचादेखील सांभाळ सुरू झाला. परंतु एके दिवशी बागेत खेळत असताना एंजेलिकाची नजर चुकवून स्नूपीने बागेच्या कठडय़ावरून उडी मारली आणि ती थेट रस्त्यावर पळू लागली. एंजेलिकाच्या हे लक्षात येताच तिने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याजवळ पोहचण्याआधीच एका धावत्या गाडीने स्नूपीला उडवले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करत असतानाच तिचा मृत्यृ झाला. स्नूपीच्या मालकाने तिच्यावर थेट खुनाचा आरोप केला.