हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नावारुपास आलेली प्रियांका चोप्रा सध्या तिच्या हॉलिवूड पदार्पणामध्ये व्यग्र आहे. ‘क्वांटिको’ या सिरिजमुळे नावाजलेल्या प्रियांकाने या सिरिजच्या दुसऱ्या भागातही अभिनय केला होता. दरम्यान, या सिरिजव्यतिरिक्त गेल्या काही दिवसांपासून प्रियांका तिच्या आगामी ‘बेवॉच’ या चित्रपटाच्या निमित्तानेही चर्चेत होती. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांमध्येही या ट्रेलरबद्दल मोठ्या प्रमाणावर उत्सुकता पाहायला मिळाली होती. पण, ट्रेलर पाहून मात्र अनेकांचाच हिरमोड झाला. या ट्रेलरमध्ये प्रियांकाची ओझरती झलकच पाहायला मिळाली होती.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बेवॉच’च्या दुसऱ्या ट्रेलरमधून ही कसर भरुन काढण्यात आली आहे असेच म्हणावे लागेल. या ट्रेलरमध्ये प्रियांकाने साकारलेल्या व्हिक्टोरिया लीड्स या व्यक्तिरेखेची झलकही पाहायला मिळत आहे. प्रियांकाचा खलनायकी चेहरा या ट्रेलरमध्ये अनेकांचेच लक्ष वेधत आहे. प्रियांकाव्यतिरिक्त या ट्रेलरमध्ये इतर कलाकारही अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. शाब्दिक विनोदांची फटकेबाजी, कलाकारांची अफलातून थरारदृश्येही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.
हा चित्रपट २६ मेला प्रदर्शित होणार आहे. ‘बेवॉच’ हा चित्रपट, याच नावाने गाजलेल्या टीव्ही मालिकेवर आधारित आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूड चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. ड्वेन जॉन्सन ‘द रॉक’ मुख भूमिकेत असून झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात प्रियांका खलनायिकेची भूमिका साकारत असून तिचे हॅलोविन स्वरूपातील पोस्टर यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांकाचे दिसलेले ओझरते दर्शनामुळे पाठ फिरविणारे चाहते हिंदी भाषेमुळे या नव्या ट्रेलरला पसंती देतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 2:21 pm