|| श्रीराम ओक

‘बाजार’, जेथे सगळे काही मिळते. या बाजारात विविध वस्तूंची, कलाकृतींचीच वैविध्यपूर्ण रूपे नाहीत, तर मानवी मनाची, संस्कारांची, विचारांची देखील नानाविध रूपे बघायला मिळतात. खूप घासाघीस करून खरेदी करण्याऱया खरेदीदारांपासून, समोरच्याच्याच गळ्यात त्याला नको असलेला माल आपल्याला हव्या त्याच किमतीला गळी उतरवणाऱया विक्रेत्यांपर्यंत असे सगळेच काही येथे पाहायला मिळते. या बाजारात विविध वस्तूंची मांडणी अशीच केलेली असते की ग्राहकांनी या वस्तूंकडे आकर्षित व्हावे आणि या वस्तूंची खरेदी करावी. मग या वस्तू रस्त्यावर मांडलेल्या असोत वा बंद काचेच्या आत. त्या वस्तूंमधील आकर्षण शक्तीच्या बरोबरीने केलेली मांडणी ग्राहकांना भुरळ घालते. ही भुरळ आणि तेथील मोहित करणाऱया वातावरणात केवळ निर्जीव वस्तूंचीच विक्री नाही, तर सजीव वस्तू देखील विकल्या जातात. सजीवांमध्ये कोंबडय़ा, बोकड, विविध प्राणी-पक्ष्यांच्या क्रमवारीत येते ती मन आणि बुद्धी असणारी ‘ती’. आपल्या आकर्षणशक्तीला अधिक आकर्षक करीत ‘ती’ त्या बाजारात विशिष्ट ठिकाणी उभी राहते आणि ‘त्याला’ आकर्षित करते. कधी उघड-उघड तर कधी छुपेपणाने आपल्या देहाचा बाजार मांडणारी ‘ती’. अशाच बाजारात उभी असणारी वय सरलेली चंपा. तिच्या कहाणीच्या रूपाने सादर होते विनीता पिंपळखरे लिखित ‘बाजार’ ही एकांकिका.

एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, पण देवीदासी प्रथेमुळे या बाजारात ओढल्या गेलेल्या एका स्त्राeची ही हृदयस्पर्शी आणि वास्तववादी कथा. येथे येऊन देखील वास्तवाचा स्वीकार करीत चंपा आपले बाईपण पूर्णत्वाला नेण्यासाठी एका बाळाला जन्म देते, पण तेथेही तिचे दुर्दैव आड येते आणि ती मुलीलाच जन्म देते. या मुलीला या बाजारापासून लांब ठेवण्याचा चंपाचा काहीसा निष्फळ प्रयत्न सुरूच असतो. या सगळ्यामध्ये एका स्त्राeचा पुतळा तिच्यासाठी सखी बनतो. हा पुतळा म्हणजे चंपाला हितगुज करण्यासाठी भेटलेली एक जिवाभावाची मैत्रीण. एक दिवशी चंपाला कळते, की हा पुतळा नसून हाडामासाची स्त्राe आहे. पैशासाठी या बाजारात पुतळा होऊन जगणारी. जेव्हा पुतळारूपी ती स्त्राe चंपाशी बोलू लागते, तेव्हा बाजारातील स्त्रियांचे आपल्यापेक्षाही भयाण असणारे स्थान उमगू लागते. या सगळ्यांबरोबरच चंपाच्या त्या मैत्रिणीमधील सकारात्मकता आणि भविष्याबाबतचा आशावाद या गोष्टी चंपासाठी नवीन असल्या, तरी त्यातून चंपाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, नवी आशा दिसू लागते. ‘व्यक्ती’ संस्थेची निर्मिती असलेल्या या एकांकिकेने आतापर्यंत 10 पेक्षा अधिक पारितोषिके पटकावली आहेत.

या एकांकिकेत वैविध्यपूर्ण ढंगांच्या भूमिका साकारणाऱया तृप्ती टिंबे आणि चंपाच्या भूमिकेतील वैशाली गोस्वामी ही अवघी दोन पात्रे ही एकांकिका एका वेगळ्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जातात. आपल्या अवतीभोवतीचा समाज, त्यातील समस्या यांची जाणीव करून देणारा अभिनयातील दमदारपणा प्रेक्षकांना समाजातील प्रश्ऱनांची दाहकता नकळतपणे करून देतो. देहविक्री करणाऱया महिलांची समस्या मांडताना, तेथील प्रतीकात्मक प्रसंगाचे चित्रण दाखविताना देखील कोणताही भडकपणा येऊ न देता तेजश्री शिलेदार यांच्या दिर्ग्दशनात या एकांकिकेसाठी हृषीकेश म्हेत्रे यांचे नेपथ्य आणि संगीत संयोजन आहे. तर प्रकाशयोजना वैभव पंडव, रंगमंच व्यवस्था करणाऱया साहिल जाधव, किरण, संजीत, निनाद यांनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

जितकी जास्त प्रगती होईल तितके बाईला विकण्याचे वेगळे प्रयत्न होतील, हे सत्य सांगणारी ही एकांकिका बाईला बाईपण जपत असतानाचा कणखरपणाच्या गरजेविषयीचे भान देऊन जाते.

shriram.oak@expressindia.com