डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत झळकणार आहेत.

नुकतेच या कार्यक्रमाचे पहिले मोशन पोस्टर बेअर ग्रिल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे. या पोस्टरमध्ये रजनीकांत आणि बेअर ग्रिल्स अॅक्शन अंदाजात दिसत आहेत.

अवश्य वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर कसं होत? पाहा त्यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलेलं पत्र

कर्नाटकातील बंदिपूर राष्ट्रीय उद्यानात रजनीकांत यांचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमधील एपिसोडचे चित्रीकरण करण्यात आले. व्याघ्र संवर्धन प्रकल्पांतर्गत १९७४ साली हे उद्यान स्थापन करण्यात आले होते.

आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये ‘थलायवा’ रजनीकांत यांनी विविध भूमिका साकारत भरपूर प्रसिद्धी मिळवली. केवळ दाक्षिणात्यच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांची क्रेझ पाहायला मिळते. आपल्या स्टाइलसाठी ते विशेष ओळखले जातात. ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमध्ये त्यांना पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. ‘दोन वाघांचा सामना पाहायला मिळणार’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रजनीकांत यांच्या बेअर ग्रिल्ससोबतच्या या एपिसोडविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.