News Flash

चित्ररंग : देखणी आणि शहाणी परीकथा

बीस्ट म्हणजे एकेकाळचा राजपुत्र अ‍ॅडम आपल्या गर्वापायी कुरूपतेचा शाप भोगतोय.

चित्रपट : ‘ब्युटी अँड बीस्ट’

परीकथांचे जग आबालवृद्धांना मोहवून टाकणारे असते. परीकथाच असल्याने त्या आभासी दुनियेतील चांगल्या-वाईटाची माया आपल्या मनावर लवकर साय धरते आणि त्या आभासी जगातला वावर प्रत्यक्षातही असावा, ही इच्छा मनात मूळ धरते. मात्र एरव्ही सुंदर, देखण्या अशा या परीकथांना शहाणपणाची जोड असेलच असे सांगता येत नाही. डिस्नेच्याच १९९१ सालच्या ‘ब्युटी अँड बीस्ट’ या अ‍ॅनिमेशनपटावर आधारित बिल कॉन्डोन दिग्दर्शित त्याच नावाचा थ्रीडी संगीतमय प्रेमपट देखणाही झाला आहे आणि शहाणपणाच्या कसोटीवरती तो किंचित सरसही ठरला आहे.

‘ब्युटी अँड बीस्ट’ची निर्मिती परीकथेला साजेशी भव्य-दिव्य आहे. अ‍ॅनिमेशनपटातून लाईव्ह अ‍ॅक्शन स्वरूपात आलेला हा चित्रपट पाहणे हा डोळ्यांचे पारणे फेडणारा, सुमधुर संगीताने नटलेला त्यामुळे कानाला गोड आणि मनाला पटेल अशी गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणून थेट काळजाला भिडतो. अठराव्या शतकातील फ्रान्समध्ये एका लहानशा गावात असलेली बेल (एम्मा व्ॉटसन) ही या चित्रपटाची नायिका आहे. बेलच्या रूपाने एक सुंदर व्यक्तिरेखा ‘ब्युटी अँड बीस्ट’मध्ये पाहायला मिळते. मूळ अ‍ॅनिमेशनपटावरून चित्रपट करताना फार काही बदल करण्यात आलेले नाहीत. बेल आणि तिचे वडील मॉरीस (केव्हिन क्लिन) हे या गावात उपरे आहेत. कारण बेल ही तिथली एकमेव शिकलेली तरुणी आहे. बेलला तिच्या वडिलांनी मॉरीसने सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहे. बेल गावातील इतर मुलींनाही वाचायला शिकवते मात्र हे गावकऱ्यांना फारसे रुचत नाही. त्यामुळे बेल आणि मॉरीस हे गावासाठी उपहासाचा विषय आहेत. तर गावात हिरोगिरी करत फिरणाऱ्या गॅस्टनला (ल्युक इव्हान) बेल पत्नी म्हणून हवी आहे. साध्या-सुंदर आणि हुशार बेलला गॅस्टनची पत्नी होऊन राहण्याचा विचारही नकोसा वाटतो. दरम्यान, जंगलातून गावाकडे परतत असताना मॉरीस रस्ता चुकतो आणि बीस्टच्या (डॅन स्टीव्हन) तडाख्यात सापडतो. वडिलांच्या शोधात बेलही बीस्टच्या महालात येऊन पोहोचते. बेल शिताफीने वडिलांना सोडवते आणि स्वत: बीस्टच्या कैदेत राहते. इथून बेल आणि बीस्ट यांची एकत्र कथा सुरू होते.

बीस्ट म्हणजे एकेकाळचा राजपुत्र अ‍ॅडम आपल्या गर्वापायी कुरूपतेचा शाप भोगतोय. तोच काय त्याच्या महालातील सगळे सहकारी वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपात कैद होऊन राहिले आहेत. बेलच्या येण्याने राजपुत्राबरोबरच आपलीही या शापातून सुटका होईल, अशी आशा या सगळ्यांच्या मनात जागते. ते एरव्ही संतापी अशा बीस्टच्या मनात प्रेमाची कल्पना रुजवतात. बेल आणि बीस्टच्या प्रेमाची ही कथा भव्य पडद्यावर पाहण्यातच खरी मजा आहे. बीस्टचा महाल ज्याला थोडीशी काळसर-निळी छटा आहे. तर बेलचे गाव जिथे वनराई आहे, मोकळा सूर्यप्रकाश आहे. अशा दोन पूर्ण वेगळ्या फ्रेम्स आपल्याला एकाचवेळी या चित्रपटात पाहायला मिळतात. अठराव्या शतकातील फ्रान्स दिग्दर्शकाने हुबेहूब उभे केले आहे. त्यातही बीस्टचा भव्य राजमहाल, शापानंतर त्याला आलेली अवकळा पण त्यातूनही डोकावणारे त्याचे एकेकाळचे आलिशान वैभव या गोष्टी व्हीएफएक्स तंत्राच्या मदतीने इतक्या तपशिलात जाऊन उभ्या केल्या आहेत की हा चित्रपट पाहणे ही खरोखरच पर्वणी ठरते. मात्र खरी कमाल येते ती त्या महालात प्राचीन वस्तूंच्या रुपाआड अडकलेल्या राजाच्या जिवलगांनी बेलसाठी उभे केलेले आनंदाचे समांतर विश्व.. गाण्यांच्या मदतीने ही परीकथा रंगवत नेण्याची दिग्दर्शकाची कल्पनाही शंभर टक्के यशस्वी ठरली आहे.

इतर परीकथांपेक्षा बेल वेगळी वाटते. कारण तिला कुरूप चेहऱ्याचा बीस्ट आपलासा वाटतो. त्याची हुशारी, त्याचे प्रेम, त्याचा निरागसपणा तिच्यासाठी त्याच्या रूपापेक्षाही वरचढ ठरतो. बीस्टच्या प्रेमात असतानाही जोपर्यंत त्याला तिच्या स्वतंत्रतेचे महत्त्व कळत नाही तोपर्यंत बेल त्यालाही प्रेमाची कबुली देत नाही. बेल आणि तिच्या वडिलांचे नाते, बीस्टबरोबर फुलत जाणारे नाते, महालातील इतरांबरोबरची तिची कथा असे अनेक मोहवून टाकणारे धागे या परीकथेला आणखी सुंदर बनवतात. ‘हॅरी पॉटर’ चित्रपट मालिके तून हर्मायनी म्हणून आपला ठसा उमटवणारी एम्मा व्ॉटसन ही बेलच्या भूमिकेत चपखल बसली आहे. बेलच्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक असणारा स्वतंत्र बाणा, साधा पण सुंदर चेहरा हे सगळे मुळातच एम्माकडे असल्याने तिने सहजतेने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटभर बीस्टच्या रूपात वावरणाऱ्या डॅन स्टीव्हनने केवळ नजरेतून आणि देहबोलीतून वरवर तापट आणि आतून हळवा बीस्ट साकारला आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा गॅस्टन, त्याच्या मित्राची लेफूची भूमिका साकारणारा जॉश गाड प्रत्येकाने आपली भूमिका चोख बजावली आहे.

दिग्दर्शक – बिल कॉन्डोन

कलाकार – एम्मा वॅटसन, डॅन स्टीव्हन, ल्युक इव्हान, जॉश गाड, केव्हिन क्लिन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 12:49 am

Web Title: beauty and the beast movie review by reshma raikwar
Next Stories
1 ग्लॅमगप्पा : अनुष्का मस्तीच्या मूडमध्ये
2 हा आहे सोफिया हयातचा भावी वर…
3 कुणाल कपूरचे ‘बॉडी ट्रांसफॉर्मेशन’ पाहिले का?
Just Now!
X