९०च्या दशकात आपल्या अभिनयासोबतच एका वेगळ्याच अंदाजामुळे तरुणींच्या मनावर राज्य करणारा एक अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी. भारदस्त आवाज तसेच एक अभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावरचा त्याचा वावर आणि प्रभावी व्यक्तिमत्व या गोष्टींच्या बळावर सुनीलच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत गेला. कलाविश्वात तो फक्त अभिनयासाठीच नव्हे तर शारीरिक सुदृढतेसाठीसुद्धा ओळखला जातो. वाढत्या वयाचा आकडा नेमका असतो तरी कसा, याची पुसटशीही कल्पना सुनीलला नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असा हा अभिनेता ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्ध आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील कलाकारही त्याला याच नावाने संबोधतात. पण, सुनीलला ‘अण्णा’ हे नाव नेमके दिले कोणी, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असेल. सहसा कुटुंबातीलच व्यक्ती एखाद्या टोपणनावाने आपल्याला हाक मारतात आणि तेच नाव पुढे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. पण, सुनीलला अण्णा हे नाव त्याच्या कुटुंबियांनी नव्हे तर एका बॉलिवूड अभिनेत्याने दिले आहे. तो अभिनेता म्हणजे, संजय दत्त. याविषयी सुनील शेट्टीनेच ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता.

‘काँटे’ चित्रपटाच्या वेळी या साऱ्याची सुरुवात झाली. सुनील शेट्टी, अमिताभ बच्चन, संजय दत्त या चित्रपटासाठी काम करत असतानाच एक दिवस संजयने त्याला ‘अण्णा’ म्हणून हाक मारली. आपले वागणे नेहमीच मोठ्या माणसांप्रमाणे असल्यामुळे संजूबाबाने हे नाव दिल्याचे सुनीलने या मुलाखतीत सांगितले. संजूबाबाने सुरुवात केली आणि तेव्हापासून मला अण्णा नावाने संबोधले जाऊ लागले, असे तो म्हणाला. संजूबाबा मागोमागच अमिताभ यांनीसुद्धा सुनीलला ‘अण्णा’ म्हणूनच हाक मारण्यास सुरुवात केली. आता खुद्द बिग बींनीच मला अण्णा म्हणून हाक मारण्यास सुरुवात केली आणि त्यांना संजय दत्तचीही साथ मिळाली तेव्हा मग इतरांसमोर काही पर्यायच नव्हता. त्यामुळेच तो ‘अण्णा’ या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाने आपण ओळखलं जाणं मला आवडतं, असं सुनीलने त्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

वाचा : ‘टायगर जिंदा है’चा असाही एक विक्रम, आमिरच्या ‘३ इडियट्स’ला टाकले मागे

आपल्याला मुलं वगैरे ‘अण्णा’ म्हणतात तोवर चांगलं वाटतं. पण, मुलींनी ‘अण्णा’ म्हणून संबोधणं बऱ्याचदा मला आवडत नाही, असंही मिश्किलपणे हसत त्याने सांगितलं. आपल्याला हे नाव मिळण्याचा किस्सा फारच रंजक असल्याचं सांगत ज्यावेळी या नावाने कोण हाक मारतं तेव्हा आपुलकीची भावता आपोआपच त्यातून झळकते हे सुनीलने न विसरता नमूद केलं. एखाद्या कलाकाराला वेगळ्याच नावाने ओळखलं जाणं हे त्या कलाकाराच्या लोकप्रियतेचं लक्षण असतं. सुनील शेट्टीला हीच लोकप्रियता ‘अण्णा’ या नावाने देऊ केली असं म्हणायला हरकत नाही.