News Flash

सरधोपट वाट

चित्रपटाचा कथाविषय खूप महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

शाळा संपता संपता सर्वात मोठा प्रश्न मुलं आणि पर्यायाने त्यांचे पालक यांच्यासमोर असतो तो म्हणजे कोणत्या शाखेत शिक्षण घ्यायचं, जेणेकरून मनाजोगती नोकरी-व्यवसायाची संधी मिळेल? अनेकदा आपल्याला नेमकं  काय काम करायचं आहे? कोणत्या क्षेत्रात काम केल्यानंतर आपल्याला मनापासून समाधान आणि पैसे दोन्ही मिळतील? याचं उत्तर शोधता शोधता आयुष्याची उमेदीची वर्ष खर्ची पडतात. त्यातही ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ आणि आर्थिक-सामाजिक स्तरांनुसारही यात फरक पाहायला मिळतो आणि तरीही गरीब असो वा श्रीमंत.. माझा मुलगा किंवा मुलगी पुढे जाऊन कोण होणार? हा प्रश्न पालकांना छळत राहतो, तर नोकरी-व्यवसायातून आपलं अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या तरुणाईची जी ससेहोलपट होत असते ती वेगळीच.. या वास्तव विषयाला अगदी पुसटसा स्पर्श करायचा प्रयत्न ‘बेफाम’ या चित्रपटात करण्यात आला आहे.

टाळेबंदीनंतर चित्रपटगृहातून चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस काही निर्माते-दिग्दर्शक करताना दिसत आहेत. अमोल कागणे निर्मित आणि कृष्णा कांबळे दिग्दर्शित ‘बेफाम’ हा सध्या चित्रपटगृहातून प्रदर्शित झालेल्या काही निवडक मराठी चित्रपटांपैकी एक आहे. सिद्धार्थ शारंगपाणी या करिअरबाबतीत गोंधळलेल्या तरुणाची कथा यात पाहायला मिळते. सिद्धार्थचे वडील प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. आपल्या मुलानेही न्यूरोसर्जन व्हावं आणि आपलं रुग्णालय सांभाळावं, ही त्यांची किमान आणि कमाल अपेक्षा आहे. मात्र वडिलांची अपेक्षा कितीही योग्य असली तरी न्यूरोसर्जन होण्याची आपली पात्रताच नाही हे लक्षात येऊनही के वळ वडिलांच्या आग्रहाखातर सिद्धार्थ परीक्षा देतो. अर्थातच, हा विषयच त्याच्या डोक्यावरून जाणारा असल्याने अभ्यासातही त्याचे मन रमत नाही आणि प्रवेश परीक्षेत तो सपशेल नापास होतो. सिद्धार्थ वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासात कमी पडत असला तरी त्याच्याकडे अजिबातच हुशारी नाही, असेही नाही. के वळ आपल्याला नेमका कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो किं वा कोणत्या कामाने आपल्याला समाधान मिळेल, हेच त्याच्या लक्षात येत नाही. करिअरच्या शोधात बारावीचं शिक्षण झाल्यानंतर सिद्धार्थ मिलिटरीत जाण्याच्या तयारीपासून विमा एजंट ते रेडिओ जॉकी अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करतो, मात्र कु ठेच तो फार काळ टिकत नाही. अखेर त्याच्या या गोंधळातून त्याला वाट कशी मिळते, याची कथा दिग्दर्शक कृष्णा कांबळी यांनी या चित्रपटात मांडली आहे.

चित्रपटाचा कथाविषय खूप महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही. त्यामुळे अशा विषयावर एखादा मराठी चित्रपट पाहायला मिळणं ही एरवी सुखावून जाणारीच गोष्ट, मात्र करिअरमधील गोंधळाचा विचार करता हा विषय व्यक्तिगणिक बदलणारा आहे. यात कोण्या एकाला जे उत्तर मिळेल तेच थोडय़ाफार फरकाने इतरांनाही मिळेल, असे नाही. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, आजूबाजूची परिस्थिती, व्यक्तीचा स्वभाव, भावनांक सगळ्याच घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे सिद्धार्थची गोष्टही आपल्याला या विषयावर ठाम विचार देत नाही, के वळ सिद्धार्थच्या गोष्टीपुरतेच उत्तर दिग्दर्शक यात देतो. तेही पटणारे आहे असे नाही, त्यामुळे एका व्यक्तीची गोष्ट यापलीकडे हा चित्रपट आपल्याला नेत नाही. दिग्दर्शक म्हणून त्याची मांडणी इतक्या सरधोपट पद्धतीने करण्यात आली आहे, की अनेकदा कधी संपतो आहे चित्रपट अशी अवस्था होऊन जाते.

चित्रपटाच्या नावात जो बेफाम आहे ते बेफामपणा आपल्या नायकाच्या व्यक्तिरेखेत कु ठेही दिसत नाही. अनेकदा सिद्धार्थला खरंच काही कळत नाही की काय.. अशी प्रेक्षकांची अवस्था होते. ‘फॉरेस्ट गम्प’मधील नायकासारखा तो के वळ प्रामाणिकपणे आपले आयुष्य पुढे जगत राहतो, मात्र फॉरेस्टच्या आयुष्यात किमान काही लक्षणीय गोष्टी योगायोगाने का होईना घडत होत्या. इथे आपला सिद्धार्थ त्याही बाबतीत दुर्दैवी ठरला आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले या दोन तरुण कलाकारांची नावे खरे तर आपल्याला चित्रपटापर्यंत आणण्यासाठी पुरेशी आहेत. प्रत्यक्षात सखीचा प्रवेश चित्रपटात फार उशिरा होतो. तिला नायिके चीही धड भूमिका देऊ के लेली नाही. त्यामुळे एका अर्थी हा चित्रपट फक्त आणि फक्त सिद्धार्थ चांदेकरभोवती घुटमळत राहतो. नाही म्हणायला सिद्धार्थबरोबर काही प्रसंगांत त्याचा मित्र म्हणून नचिके त पूर्णपात्रेची व्यक्तिरेखा दिग्दर्शकाने योजिलेली आहे, पण त्यालाही ठोस व्यक्तिमत्त्व नाही. एक तर सिद्धार्थच्या व्यक्तिरेखेचे वय आणि त्याच्या समस्या पाहता तो त्यात पूर्णपणे फिट बसलेला नाही. त्याची व्यक्तिरेखाच मुळात लिखाणात गोंधळलेली असल्याने त्यात सिद्धार्थ अभिनयाने रंग भरू शके ल, असेही काही नाही. चित्रपट पाहताना हृतिक रोशनच्या ‘लक्ष्य’चीही आठवण आल्याशिवाय राहत नाही, मात्र तीही तेवढय़ापुरतीच.. चित्रपटात ‘पोरगं वाया गेलंय’ हे सुरुवातीचं गाणं सोडलं तर नसलेल्या प्रेमकथेसाठी एक पूर्ण गाणं दिग्दर्शकाने यात खर्ची घातलं आहे. या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून धड निखळ मनोरंजनाचा आनंदही हा चित्रपट देत नाही.

बेफाम

दिग्दर्शक – कृष्णा कांबळे

कलाकार – सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले, विद्याधर जोशी, सीमा देशमुख, नचिके त पूर्णपात्रे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:02 am

Web Title: befam marathi movie review abn 97
Next Stories
1 पुन्हा सुगंध पानांचा..
2 ‘बाई’ रेखाटताना
3 वयाच्या ५७व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न
Just Now!
X