काहीएक वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा शाहरूख खान हा ‘द बादशहा ऑफ बॉलीवूड’ व्हायचा होता त्यावेळी त्याला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’सारखा अप्रतिम चित्रपट दिग्दर्शक म्हणून तितकाच तरुण आणि नवखा असलेल्या आदित्य चोप्राने दिला होता. इतक्या वर्षांच्या काळात दोन नायिकांमध्ये गोंधळलेला नायक ही प्रामाणिक कल्पना यशराज फिल्म्सने खेळवली आणि तेवढी र्वष सुपरस्टार होण्याच्या नादात शाहरूखने ती इमानेइतबारे निभावली. मात्र आता काळ नायिकांचा आहे, त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मुख्य प्रवाहातील म्हणून जे प्रेमपट आले त्यात दोन नायकांमध्ये गोंधळलेली नायिका केंद्रस्थानी आली आहे. पहिल्याच झटक्यात नजरानजर झाल्यानंतर थेट बेडरूममध्ये शिरणाऱ्या पिढीच्या प्रेम, लग्न या संकल्पनांमधला गोंधळ हाच ‘बेफिक्रे’त पाहायला मिळतो.

‘बेफिक्रे’ हा आदित्य चोप्राचा दिग्दर्शक म्हणून अवघा चौथा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी खरोखरच लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्याच्या धाडसाचे अंमळ कौतुकच करायला हवे. ‘बेफिक्रे’ हा बेधडक-बिनधास्त केलेल्या प्रेमाची गोष्ट सांगतो. त्यामुळे चित्रपटातील नायक-नायिका ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे..’ असं म्हणत एकत्र येतच नाहीत. ते एकमेकांच्या बिनधास्त स्वभावाने आकर्षित होतात, त्याच सहजपणाने ते एकत्र दंगामस्ती करतात आणि नायिका शायरा (वाणी कपूर)पॅरिसमध्येच वाढली असल्याने तितक्याच सहजपणे ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्येही शिरतात. धरम (रणवीर सिंग) दिल्लीतून पॅरिसमध्ये कामाच्या शोधात आला आहे. पहिल्याच भेटीत धरम आणि शायरा एकमेकांकडे आकर्षित होतात. प्रेमाच्या भानगडीत पडायचं नाही, त्यामुळे गुंता वाढतो, या अटीवर शायराने धरमबरोबर एकत्रित राहणं मान्य केलं असल्याने एकमेकांबद्दलची नेमकी भावना काय याचा दोघांच्याही मनात गोंधळ उडतो. पहिला पहिला नवथर प्रेमाचा (की शारीरिक आकर्षणाचा?) जोर ओसरल्यानंतर थोडीशी शहाणी झालेली, सावरलेली शायरा धरमपासून वेगळी होते. धरमची कथा मात्र एका मुलीकडून दुसरीकडे सुरूच राहते. वर्षभरानंतर हे दोघंही जेव्हा भेटतात तेव्हा एकमेकांशी जोडलेलं राहणं दोघांनाही हवं असलं तरी आता ते प्रियकर-प्रेयसी नाहीत, ही जाणीव त्यांच्यात स्पष्ट असते. पहिल्या ब्रेकअपनंतर झालेली या दोघांची चांगली मैत्री आणि मग पुन्हा प्रेमाकडे त्यांना घेऊन येणारी ही प्रेमकथा दिग्दर्शकाने हलकीफुलकी ठेवली आहे. फार भावनिक गुंतागुंत नाही, पल्लेदार संवाद नाहीत. यामुळे प्रेक्षक उगाचच डोळ्यांतून पाणी काढत बसत नाही. खरं म्हणजे भावनिकरीत्या गुंतवून ठेवणारे प्रेमपट ही यशराजच्या चित्रपटांची खरी ओळख आहे जी ‘बेफिक्रे’च्या निमित्ताने पार गळून पडली आहे. ‘बेफिक्रे’ हा पूर्णपणे आत्ताच्या पिढीला समोर ठेवून केलेला चित्रपट आहे. पण प्रेमकथेत मुळात दोघांना घट्ट बांधून ठेवणारं प्रेम, प्रणय हा मुख्य धागा असतो. ते प्रेम चित्रपटात पाहायला मिळत नाही. त्याउलट, या दोघांच्या मनातला गोंधळच चित्रपटभर व्यापून राहतो.

ravi05

रणवीर सिंगला डोळ्यांसमोर ठेवून ‘धरम’ची व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक सहजस्वभावाचा फायदा दिग्दर्शकाने या व्यक्तिरेखेसाठी करून घेतला आहे. हा चित्रपट रणवीरमुळेच पाहण्यायोग्य झाला आहे. शायराच्या भूमिकेत वाणी कपूर फिट्ट बसली असली तरी चित्रपटाच्या केंद्रस्थानी तिची व्यक्तिरेखा असूनही तिला स्वत:चा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे प्रेमी जोडपे म्हणूनही त्यांचा प्रभाव मर्यादित राहतो. आत्ताच्या पिढीतील बेफिकीर प्रेमाची ओळख करून देतानाच त्यांना त्यातला फोलपणा जाणवल्यावर त्यांचं अधिक समजूतदारपणाने एकत्र येणं हा प्रवास चांगला रंगवला आहे. पण शेवटाला वास्तवापेक्षा फँटसीचा डोस जास्त झाल्याने चित्रपट गमतीपुरता उरतो. चित्रपटाच्या प्रोमोजमधून चुंबनदृश्यांपासून सगळंच ‘हॉट’ असल्याचं जे चित्र निर्माण केलं गेलं आहे तेही फसवंच आहे. तरीही खटकेबाज संवाद, नृत्य- विशाल-शेखर यांचं संगीत असलेली उडती गाणी, रणवीरचा सहज अभिनय आणि आकर्षक मांडणी या जोरावर ‘बेफिक्रे’ तीन तासांची करमणूक नक्की करतो!

बेफिक्रे

दिग्दर्शक – आदित्य चोप्रा

कलाकार – रणवीर सिंग, वाणी कपूर.