अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाचीच चर्चा बॉलिवूड वर्तुळातही रंगल्याचे पाहायला मिळाले. दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचे ग्रॅण्ड प्रिमिअर केल्यानंतर सोशल मीडियावर सर्वांनीच या चित्रटाला उचलून धरले आहे असेच म्हणावे लागेल. चौकटीबाहेरच्या कथानकाला हात घालणाऱ्या या चित्रपटाद्वारे आदित्य चोप्राने दिग्दर्शन क्षेत्रात एक नवा प्रयोग केला आहे. त्यामुळे नेहमीच प्रेमाला मध्यभागी ठेवत त्याभोवती फिरणाऱ्या चित्रपटांपेक्षा ‘बेफिक्रे’ कितपत वेगळा आहे याचे पडसाद आता सोशल मीडियावर उमटत आहेत.

या चित्रपटाद्वारे अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत, त्यासोबतच आठ वर्षांनंतर आदित्य चोप्राने पुन्हा एकदा त्याचा मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला आहे. प्रेमसंबंध, नाते आणि कोणत्याही नात्याबद्दल असणाबद्दल असणारी बांधिलकी याकडे तरुणाई कोणत्या दृष्टीकोनाने पाहते याचे चित्रण या चित्रपटामध्ये केले आहे. त्यामुळे ‘बेफिक्रे’ हा चित्रपट अनेकांनाच त्यांच्या जवळ जाणारा वाटत आहे. दुबईमध्ये या चित्रपटाच्या प्रिमिअरनंतर तेथील प्रसिद्ध चित्रपट समीक्षक उमैर संधूने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन या चित्रपटाबद्दलची एक पोस्ट केली आहे. ‘चित्रपटाच्या पूर्वार्धामध्ये काही सुरेख क्षण पाहायला मिळतात. दिग्दर्शक म्हणून आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटासाठी चांगली मेहनत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. विशाल-शेखरने या चित्रपटाला दिलेले संगीतही लक्षवेधी आहे’ असे म्हणत त्याने या चित्रपटातील गाण्यांचीही प्रशंसा केली आहे.

प्रेक्षकांनीसुद्धा या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफीची आणि विहंगम दृश्यांची प्रशंसा केली आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया साइट्सवरही रणवीर-वाणीच्या ‘बेफिक्रे’बद्दल बोलले जात आहे. या चित्रपटाचे कथानक आणि पात्र पाहता फ्रेंच संवाद आणि शब्दांचा या चित्रपटावर पगडा आहे. त्यामुळे चित्रपटातून काही सोपे फ्रेंच शब्द नक्कीच तुमच्यासाठी उपयोगाचे ठरतील. या चित्रपटासाठी वाणी आणि रणवीरने फ्रेंच भाषेचा रितसर अभ्यास केला होता. चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरमधून वाणी कपूरच्या फ्रेंच ‘वाणी’ची झलकही पाहायला मिळाली आहेच. त्यामुळे आदित्य चोप्रांचा हा ‘बेफिक्रे’ प्रयोग प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे.