23 March 2019

News Flash

जेव्हा भिकारी दिलीप जोशींना ‘जेठालाल’ म्हणून हाक मारतो

दिलीप जोशींचा हा गमतीशीर किस्सा नक्की वाचा

अभिनेता दिलीप जोशी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने नुकतीच नऊ वर्षे पूर्ण केली असून दहाव्या वर्षात पदार्पण केलंय. गेल्या नऊ वर्षांपासून या विनोदी मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवले. यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या परिचयाची झाली आहे. जेठालाल, दयाबेन यांसारख्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता दिलीप जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत जेठालाल गडा ही व्यक्तिरेखा साकारली. मुळात दिलीप यांना बरेचजण त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ‘जेठालाल’ याच नावाने जास्त ओळखतात. याच नावाचा एक गमतीशीर किस्सा दिलीप यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला.

‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत दिलीप जोशी म्हणाले की, ‘आमच्या मालिकेने नऊ वर्षांचा हा दीर्घ प्रवास पूर्ण केला यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. जेव्हा पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं तेव्हा इतक्या वर्षांपर्यंत ही मालिका टीकेल, लोकांचं इतकं प्रेम मिळेल याचा कोणी विचारच केला नव्हता. यासाठी मी प्रेक्षक आणि देवाचे आभार मानतो.’

Baadshaho trailer: जबरदस्त अॅक्शन, दमदार संवादाने परिपूर्ण ‘बादशाहो’

दिलीप जोशी या मालिकेपूर्वी चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. पण, त्यांच्या वाट्याला हवंतसं यश आलं नव्हतं. मात्र त्यांचं नाव खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचलं ते म्हणजे ‘जेठालाल’ या भूमिकेमुळे. यासंदर्भातील एक गमतीशीर किस्सा दिलीप जोशी यांनी या मुलाखतीत सांगितला. ‘इतक्या वर्षांत माझी खरी ओळख हरवली आहे. लोक मला दिलीप नाही तर जेठालाल याच नावाने हाक मारतात. एकदा आम्ही अहमदाबादला शूटिंगसाठी गेलो होतो आणि आम्ही एका ओपन जीपमध्ये होतो. आमची जीप एका सिग्नलजवळ थांबली. तेव्हा सिग्नलजवळ असलेला एक भिकारी मला पाहून अचानक जेठालाल, जेठालाल म्हणून ओरडू लागला. हे ऐकून मीदेखील थक्क झालो. एखाद्याच्या घरी टिव्ही बघताना त्याने मला पाहिले असावे असा मी विचार केला. मात्र त्यावेळी मला एका अभिनेत्याच्या ताकदीचा अनुभव आला. अशी अजून एक घटना आहे. मी एका लग्नाला गेलो होतो आणि तिथे मला एक महिला भेटली. त्या महिलेची आई ८० वर्षांची असून, वय झाल्याने ती कुटुंबात कोणालाच ओळखू शकत नव्हती. मात्र जेव्हा कधी माझी मालिका टिव्हीवर लागते तेव्हा त्या मला आवर्जून ओळखतात आणि हसू लागतात, असे मला त्या महिलेने सांगितले. हे ऐकून मला फार आनंद झाला.’

वाचा : या गोकुळाष्टमीला ऐकायला मिळणार हेमा मालिनी यांच्या सुरेल आवाजातील भजन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या नऊ वर्षांच्या प्रवासादरम्यान त्यातील भूमिकांना भरभरून प्रसिद्धी मिळाली आणि आजही ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकतेय हे या उदाहरणानंतर नक्कीच स्पष्ट झाले.

First Published on August 8, 2017 1:17 pm

Web Title: beggar called dilip joshi of taarak mehta ka ooltah chashmah as jethalal and he was shocked