बॉलिवूडमध्ये विद्या बालन हरहुन्नरी असल्याचे कदापि कोणी नाकारणार नाही. अनेक दमदार चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारुन तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. विद्या सध्या आगामी ‘बेगम जान’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. आजच्या घडीला विद्याचे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये घेतले जात असले तरी एकेकाळी हे क्षेत्र सोडण्याचा विचार तिच्या मनात आला होता. विद्याने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमध्ये आपली छबी चालणार नसल्याचा किस्सा शेअर कला होता. ‘हे बेबी’ आणि ‘किस्मत कनेक्शन’ या चित्रपटानंतर तिला बॉलिवूडमध्ये किस्मत कनेक्शन अवघड असल्याचे वाटले होते.

संघर्षाची कहाणी सांगताना विद्याने चित्रपटसृष्टीतून माघार घेणार असल्याचे सांगितले होते. विद्या म्हणाली की, “काही चित्रपटानंतर कौतुकाचा वर्षाव झाल्यावर ‘हे बेबी’ आणि ‘किस्मत कनेक्शन’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर माझ्या वजन आणि कपड्यांच्या स्टाइलमुळे माझी थट्टा करण्यात आली. माझ्यावर झालेली टीका मला सुन्न करणारी होती. यापूर्वी माझ्यावर झालेला कौतुकाचा वर्षावर मला भासच वाटू लागला. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतूनही मी हाच अनुभव घेत होते. त्यामुळे या क्षेत्रात मला यश मिळणे कठीण असल्याचे वाटत होते.” विद्या म्हणाली की, “हे क्षेत्र माझ्यासाठी नाही, असा विचार मला सतावत होता. पण त्यानंतर मी यातून बाहेर येण्याचा निश्चय केला.”

आज विद्याकडे पाहिले तर तिचा निश्चय तिने पूर्ण केला, असे म्हणावे लागेल. ‘पा’, ‘डर्टी पिक्चर’ ‘भूलभुल्लैया’ आणि ‘कहानी’ या चित्रपटातील भूमिकांनी ती हरहुन्नरी ठरली आहे. तिच्याबद्दल विशेष सांगायचे तर आजच्या घडीला चित्रपटसृष्टीमध्ये स्त्रीप्रधान चित्रपटाची निर्मिती करायचा विचार करणारा दिग्दर्शक निर्मात्याची पहिली पसंती ही विद्यालाच असते. विद्याचा आगामी चित्रपट ‘बेगम जान’ येत्या १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिचे आणखी एक वेगळे रुप पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरला आणि ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट ती आणखी एक पुरस्कार मिळवेल का? हे पाहणे उत्सुकतेचे असेल.