चित्रपटाचे यश कमी पडते की काय म्हणून रुपेरी पडद्यावरच्या कलाकारांना छोटा पडदाही भुरळ घालतो आहे. मालिका-रिअ‍ॅलिटी शोज नाहीतर गेला बाजार आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने का होईना वेगवेगळ्या वाहिन्यांवर हजेरी लावल्याशिवाय मोठय़ा कलाकारांना चैन पडत नाही. त्याचे कारण छोटय़ा पडद्याचा विस्तार हा खूप मोठा आहे हे एक असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये आशय आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करत प्रेक्षकांना टीव्हीशी घट्ट जोडून घेण्याचं काम हे या वाहिन्यांच्या नव्या सूत्रधारांनी केलेलं आहे. एक मोठी तरुण फळी या वाहिन्यांचा आशय, त्यांच्या मालिका, त्यांचा दर्जा, त्यांचे कलाकार, त्यांचे मार्केटिंग, प्रेक्षकांचा कौल अशा बारीकसारीक तपशिलांवर काम करत नवं काही देण्याचा सातत्याने प्रयत्न करते आहे आणि या प्रयत्नांचाच एक परिणाम म्हणून संपूर्ण ऐतिहासिक मालिकांची वाहिनी, स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून पुढे आलेली वाहिनी, पाकिस्तानातील लेखक-कलाकारांना प्रेक्षकांसमोर आणणारी वाहिनी, अमिताभ बच्चन-अनिल कपूरसारख्या धुरिणांना छोटय़ा पडद्यावर येण्यास भाग पाडणारी वाहिनी.. मनोरंजनाची एक आत्तापर्यंत गुप्त असलेली अलिबाबाची गुहा जशी उघडावी तसं एक नवं जग आपल्यासमोर उभं राहिलं आहे. या वर्षी या गुहेत शिरलेल्या प्रेक्षकांसाठी छोटय़ा पडद्याच्या या सूत्रधारांनी काय योजना आखल्या आहेत हे त्यांच्याच शब्दात..

सोनी टीव्ही
चांगल्या मालिका देण्यावर भर असेल!
आमच्या वाहिनीचे टीआरपी रँकिंग चांगले नाही. सध्या तरी आम्ही पाचव्या स्थानावर आहोत. त्यामुळे स्पर्धेत पुढे येण्यासाठी सततचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नवीन मालिका, नवीन कार्यक्रम, नवीन चेहरे आणत आहोत. त्यातीलच एक प्रयोग म्हणजे मागच्या वर्षी पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेली ‘युद्ध’ ही मालिका. आपल्याकडे एक विशिष्ट वर्ग टीव्ही पाहत नाही. आजही भारतात १७ ते २० टक्केच लोक  टीव्ही पाहतात. सुमारे ७०-८० टक्के लोक प्राइम टाइमपासून दूर आहेत. त्यांना टीव्हीकडे आकर्षित करण्यासाठी नेहमीच्या मालिकांपेक्षा काहीतरी वेगळे घेऊन येण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी पर्याय म्हणून आम्ही कमी भागांच्या मालिका तयार केल्या. पोलीस आणि गुन्हेगारी विश्वावरच्या मालिकांमधून लोकांना वास्तवाचे भान मिळते आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे लोक हे कार्यक्रम आवर्जून बघतात. म्हणूनच यंदाही या प्रकारच्या मालिका घेऊन प्रेक्षकांसमोर येऊ. दैनंदिन मालिकांच्या बाबतीत आम्ही काहीसे मागे आहोत. जास्तीत जास्त दैनंदिन मालिका बनवण्याचा आमचा मानस आहे. आम्ही या मालिका सोमवार ते गुरुवार दाखवतो ही आमची अडचण आहे. इतर वाहिन्यांवर याच मालिका सोमवार ते शनिवार दाखवतात. त्यामुळे एकंदरीतच मालिकांच्या प्रसारणाची आखणी ते वेगळ्या दैनंदिन मालिकांची निर्मिती असा आमचा भर असेल!
नचिकेत पंतवैद्य, व्यवसाय प्रमुख

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

झी टीव्ही
प्रेक्षकांच्या आवडीचा नेमका अंदाज आलायं
मालिका आणि इतर कार्यक्रमांच्या बाबतीतही गेले वर्ष आमच्यासाठी उत्तम होते. आम्ही प्रेक्षकांसाठी विविध विषयांवरच्या मालिका आणल्या आहेत. आता मालिकांच्या बाबतीत सतत प्रयोग करणं हे आमच्या क्षेत्रात पर्यायाने असतंच. त्यामुळे यंदाचे मुख्य दोन बदल असतील ते म्हणजे कमी भागांच्या पण वेगळ्या विषयांवरच्या मालिका आणि साहित्यावर आधारित मालिकांची निर्मिती. कोणत्या प्रकारचे कार्यक्रम टीव्हीवर यशस्वीरीत्या चालतात याचा अंदाज आम्हाला आला आहे आणि त्यादृष्टीने आम्ही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवसांच्या प्राइम टाइमसोबतच शनिवार आणि रविवारीसुद्धा प्रेक्षकांची पकड सैल होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
नमित शर्मा, कार्यक्रम प्रमुख

सब टीव्ही
विनोदी मालिकांची वाहिनी हीच ओळख..
अमेरिकेत साधारण ७०च्या दशकापासून विनोदनिर्मितीला सुरुवात झाल्यावर बरेच लेखक, कलाकार पुढे आले. आपल्याकडे अलीकडच्या काळापर्यंत विनोदाच्या क्षेत्रामध्ये तितकेसे काम झालेलं नव्हतं. वाहिनीला सुरुवात केली तेव्हा आम्हाला दर्जेदार विनोदी साहित्याची कमतरता जाणवली. मग नाटय़ कलाकार आणि लेखक यांची मदत आम्ही मालिकेसाठी घेतली. आज त्यांच्याच पाठबळामुळे वाहिनी जोमात सुरू आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. सध्या मालिकांमधून लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील विनोदाचे वेगवेगळे पैलू दाखवण्यावर भर आहे. दैनंदिन मालिका न पाहणारा प्रेक्षकवर्ग विनोदी मालिकांकडे वळतो हे आमच्या लक्षात आलं आहे.  सध्या सहा विविध वाहिन्यांवर दैनंदिन मालिका दाखवतात. पण, विनोदी मालिकांबाबत आमची मक्तेदारी आहे. ती टिकवून ठेवणं हे उद्दिष्ट आहे.
– अनुप कपूर, व्यवसाय प्रमुख

स्टार प्रवाह
प्रेक्षकांना सतत नवीन कार्यक्रम देण्याची जबाबदारी
यश किंवा अपयश या ठोकताळ्यांपलीकडे जाऊन सांगायचं तर मागचं वर्ष उत्तम होतं. विविध प्रयोग करण्याचं धाडस आम्ही केलं. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, कथानकं, तरुणांना आवडतील अशा मालिका आणण्याच्या प्रयत्नातून एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला. या वर्षी दैनंदिन मालिकांच्या व्यतिरिक्त कार्यक्रमांमध्ये पठडीबाहेरील प्रयोग करायचे आहेत. परदेशी संकल्पनांऐवजी नवीन संकल्पनांवर आधारित कार्यक्रम घेऊन येणार आहोत. मराठी प्रेक्षक नावीन्याचा भुकेला आहे. तरुणांच्या मनोरंजनाच्या कक्षा उंचावल्या आहेत. मनोरंजनाचे पर्याय वाढूनही नावीन्याच्या शोधात ते टीव्हीकडे परततात. त्यांना सतत नवीन देत राहणं ही आमची जबाबदारी आहे. पठडीतील कार्यक्रम टीव्हीवर केवळ सवय म्हणून पाहिले जात असले, तरी प्रेक्षकांना इतर पर्याय मिळाल्यावर ते दुसरीकडे वळतात. सध्या आम्ही मराठी सिनेमा, नाटय़, मालिका क्षेत्रातील टीव्हीवर काम करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या सोबतीने वाहिनीत प्रयोग सुरू आहेत. नवीन मालिका, वाहिन्या वाढल्यामुळे टीव्ही क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात सर्वानाच विशेषत: तंत्रज्ञांना प्रचंड काम मिळाले. प्रेक्षकांच्या टीव्हीकडून अपेक्षा वाढल्याने पुढील काळात केवळ दर्जेदार टिकून राहील.
जयेश पाटील, कार्यक्रम प्रमुख

लाइफ ओके
सर्जनशील निर्मितीच्या
स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग..
टीआरपीच्या स्पर्धेत पहिल्या नंबरवर राहण्यासाठी ‘स्टार प्लस’ला विशिष्ट प्रकारच्या साचेबद्ध मांडणीमध्ये काम करणं बंधनकारक असतं. आम्ही ‘स्टार’ परिवारातील लहान भावंडं असल्याने आम्हाला इथे सर्जनशील निर्मितीसाठी पुरेपूर स्वातंत्र्य मिळते. त्याचा उपयोग करून घेत नवनवीन प्रयोग सध्या करत आहोत. कुठल्याही मालिकेतून एखाद्या सामाजिक मुद्दय़ावर भर द्यायचा हा आमचा मुख्य उद्देश यापुढेही कायम राहणार आहे. त्याचबरोबर पाश्चात्त्य देशामध्ये विविध भाषांमधील मालिका आहेत त्या आपल्याकडच्या प्रेक्षकांना आवडतील अशा पद्धतीने रचना करून सादर करण्यावर आम्ही मेहनत घेतो आहोत. गेल्या वर्षी सुरू केलेली ‘लौट आओ त्रिशा’ ही त्या प्रकारची मालिका होती. याही वर्षी अशाच काही वेगळ्या मालिका पाहायला मिळतील.
अजित ठाकूर, व्यवसाय प्रमुख

झी टीव्ही
प्रतिक्रियेतील तत्परता वाढली
गतवर्षीप्रमाणे यंदाही विविध विषयांवर मालिकांची निर्मिती करणे हे उद्दिष्ट कायम राहणार आहे. मालिकांमधील विषय जास्तीत जास्त व्यापक आणि पूरक होताना त्यातून प्रेक्षकांना मनोरंजनाचे क्षण कायम मिळत राहतील. मागच्या वर्षांतील मुख्य दोन बदल म्हणजे मराठीतील पहिलीच पौराणिक विषयाची मालिका आम्ही भव्य स्वरूपात सादर केली. दुसरीकडे मराठी नाटक आणि सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी वाहिनीचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. यापुढे मालिका घेऊन येताना विषयांसोबतच निर्मितीमूल्यांवरही भर देण्यात येईल. त्यासाठी व्हीएफएक्ससारख्या तंत्राचा वापर होतोय. निर्माते आणि वाहिनी यांनी एक त्रित काम केल्यामुळे हे सर्व शक्य झालं. प्रेक्षकांची आवड खूप नेमकी असते. प्रेक्षक त्यांच्या आयुष्यातील एखादा पैलू मालिकेतून शोधत असतात. आता एखादी मालिका प्रेक्षकांनी स्वीकारणं किंवा नाकारणं या प्रक्रियेला पूर्वीइतका वेळ लागत नाही. त्यातील तत्परता वाढली आहे. त्यामुळे अर्थातच तत्परतेने काम करून त्यांचा विश्वास कायम ठेवणे ही जबाबदारी आमच्यावर आहे.  
 दीपक राजाध्यक्ष – व्यवसाय प्रमुख

जिंदगी
श्रीलंका, इराण, इंडोनेशियातील मालिका प्रेक्षकांसमोर येतील
भारतीय मालिकांच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानातील उत्तम मालिका एका वाहिनीवर एकत्रितरीत्या आणण्याचा प्रयत्न आम्ही मागच्या वर्षी केला. यासोबतच २०-२५ भागांच्या मालिकाची पद्धतही आणली. भारतीय प्रेक्षकांना हा प्रयोग पसंत पडला आहे. यापुढील काळात श्रीलंका, इराण, इंडोनेशिया अशा विविध देशांतील गाजलेल्या मालिका आणायच्या आहेत. या मालिका परदेशी भाषांमध्ये असल्या कारणाने त्यांच्या डबिंगला वेळ लागतो. म्हणूनच हिंदी भाषेतील पाकिस्तानी मालिका प्रथम निवडल्या. या वर्षी पाकिस्तानी आणि भारतीय टीव्ही क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत नवे कार्यक्रम तयार करायचे आहेत.
प्रियांका दत्ता, व्यवसाय प्रमुख

ई टीव्ही
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नाळ जोडणे महत्त्वाचे
टीआरपीसोबतच गुणवत्तेतसुद्धा वाहिनीला आघाडीवर न्यायचं आहे. कित्येक वर्षांतील ‘ई टीव्ही’ म्हणजे पठडीतील मालिका हे गणित आता बदललं आहे. प्रेक्षकांसोबत आम्हाला एक नातं तयार करून त्यांना वाहिनीशी जोडलेलं ठेवणं हे आव्हान होतं. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावर नसलो तरी सातत्याने वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. गंभीर प्रश्न हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळत, प्रेक्षकांचे मनोरंजन करताना त्यासोबतच उत्तम दर्जाचे कार्यक्रम देणं कायम होतं. नावीन्यपूर्ण, मनोरंजनात्मक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या कार्यक्रमांची निर्मिती हे आमचं सूत्र आहे. स्त्री-सक्षमीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मराठीतील उत्तम साहित्य मालिकांमधून आणण्याचा प्रयत्न आहे. मागच्या वर्षी पूर्ण न झालेली डिजिटायझेशनची प्रक्रिया या वर्षी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. डिजिटायझेशन मुंबई-पुण्यासोबत गावागावात पोहोचलं पाहिजे. यामुळे लोकांना निवडीचं स्वातंत्र्य मिळेल आणि त्यामुळे टीव्हीवरील चांगले तेच टिकून राहण्यास मदत होईल.
अनुज पोद्दार, कार्यकारी उपाध्यक्ष

सोनी पल
आधुनिक स्त्रीचे प्रतिनिधीत्व..
आजची स्त्री ही एकहाती अनेक जबाबदाऱ्या पार पाडते आहे. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्येही तिने नाव नोंदवलं आहे. पण, त्याच वेळी उंबरठय़ाच्या अलीकडे ती एक गृहिणी म्हणूनही आपल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडताना दिसते. आजच्या स्त्रीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मालिका मांडण्याचा उद्देश वाहिनी सुरू करण्यामागे होता. त्यानुसार या स्त्रीचे विविध पैलू मांडणाऱ्या मालिका सतत घेऊन येत आहोत. वाहिनीचा चेहरा म्हणून आपली कारकीर्द आणि संसार लीलया सांभाळणाऱ्या जुही चावलाची निवड करण्यामागेही हाच उद्देश होता.
अनुप कपूर, व्यवसाय प्रमुख

एपिक चॅनल
प्रेक्षकांना इतिहासाशी जोडायचंय
आमची वाहिनी हे एक महिन्याचं तान्हं बाळ आहे. सध्यातरी लोकांना या वाहिनीवरील मालिका, कथाआवडत आहेत. भारतीय इतिहासातील सुरस कथा प्रेक्षकांसमोर मांडायच्या आहेत. या कथांमधून शिकण्यासारखे खूप आहे. पण, शाळेतल्या धडय़ांसारखं न शिकवता त्यांची आकर्षक मांडणी केली पाहिजे. आजचा प्रेक्षक हुशार झाला आहे आणि येत्या काळात त्याच्याकडे निवडीचं स्वातंत्र्यही असेल. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्तम दर्जाच्या कलाकृती देणं गरजेचं आहे.
महेश सामंत, व्यवस्थापकीय संचालक