‘काम क्या करते हो.. भाई?’, असं कोणी हिंदी चित्रपटांच्या नायकांना प्रश्न विचारायचा अवकाश. एकतर तो डेव्हिड धवनचा चित्रपट असेल तर गोविंदासारख्या हिरोकडून एकच उत्तर यायचं ‘इम्पोर्ट-एक्स्पोर्ट का बिझनेस है अपना..’. आणि कोणी चुकून नायिकेला विचारलंच तर तीही तितक्याच लाडिकपणे ‘इनका इम्पोर्ट-एक्स्पोर्ट का बिझनेस है..’ म्हणून मोकळी व्हायची. फिल्मी आयांच्याच तोंडून ऐकू येणाऱ्या आणि पडद्यावर मात्र न दिसणाऱ्या ‘मुली के परोठय़ां’प्रमाणेच हाही ‘इम्पोर्ट-एक्स्पोर्ट बिझनेस’ काय असतो हे आजवर कोणाच्याच ध्यानात आलेलं नाही. पण याहीपेक्षा एक मोठा काळ सिनेप्रेमींनी असा पाहिला आहे जिथे नायक एकतर खूप गरीब असतो नाहीतर आमिर बाप की बिगडी हुई औलाद असतो. नायिकेला मिळवणं हे एकच त्याचं काम होतं आणि नायकाच्या प्रेमात पडणं हे नायिकेचं काम होतं. त्या वेळी हिंदी चित्रपटांमधून कायम ‘रोजी-रोटी’चा सवाल असायचा? पण ते मिळवण्यासाठी काम मात्र काहीच नाही. सामाजिक बदलाचे वारे जितक्या वेगाने वाहिले तितक्याच वेगाने चित्रपटांमध्ये जे बदल झाले त्यात ही ‘रोजी-रोटी’ फारच बदलली आहे. आणि नवलाई म्हणजे फक्त हिरोच नाही तर हिरोइन्स ‘रोजी-रोटी’ मिळवण्यासाठी पडद्यावर धडपड करताना दिसतात..

गेल्या महिन्याभरात जरी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची यादी काढली तरी त्यात प्रत्येक नायक आणि नायिकेला काम आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा गेल्या महिन्यात शंभर कोटींचा आकडा पार केलेला चित्रपट. तरुणाईला आकर्षित करणाऱ्या या चित्रपटात नायिके ला हवाईसुंदरी बनायचं आहे म्हणून ती भर लग्नमंडपातून पळून जाते. त्यानंतर चित्रपटात हवाईसुंदरी बनवण्यासाठी ती घेत असलेलं प्रशिक्षण, त्यासंबंधींची दृश्ये सविस्तरपणे येतात. दिग्दर्शकाने या प्रशिक्षण दृश्यांचाही चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी खुबीने वापर करून घेतला आहे. अनुष्का शर्माची निर्मिती असलेला ‘फिलौरी’ हा स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा सांगणारा चित्रपट आहे. मात्र इथे त्या काळात अनुष्काने रंगवलेली नायिका ही पंजाब प्रांतातली पहिली कवयित्री दाखवली आहे. तर तिचा नायक हा गायक आहे. तिच्या कविता गाऊन तो तिला नावलौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न चित्रपटात करताना दिसतो. आगामी ‘नूर’ चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात, नायिकांनी रंगवलेल्या पत्रकार याहीआधी आपण अनुभवल्या आहेत. मात्र ‘नूर’मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरल्यानंतरचा तिचा प्रवास अनुभवता येणार आहे. जे आजवरच्या चित्रणापेक्षा वेगळं ठरेल. ‘नाम शबाना’सारख्या चित्रपटातही शबाना खान गुप्तहेर यंत्रणेत सामील होताना दिसते. त्यासाठी कठोर प्रशिक्षणही घेताना दिसते. या वर्षांच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘ओके जानू’ या चित्रपटातली नायिका वास्तुविशारद म्हणून कोम करताना दिसते. तर चित्रपटाचा नायक हा अ‍ॅनिमेशनतज्ज्ञ आहे. या दोघांच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या क्षेत्राची एक झलकही या चित्रपटांमधून पाहायला मिळते. ‘२ स्टेट्स’सारख्या चित्रपटात आयआयएममधून बाहेर पडल्यानंतर नायक बँकर होण्यासाठी धडपडताना दिसतो, मात्र लेखक म्हणून स्थिरस्थावर होतो. तर नायिके लाही कामासाठी आपलं शहर सोडायची इच्छा होत नाही. हिंदी चित्रपटांचं सुकाणू सध्या नव्या विचारांच्या तरुण दिग्दर्शकांकडे आहे. आणि आपल्या चित्रपटातून सद्य:स्थिती आणि विषय हाताळताना त्यातली वास्तविकता कायम राखणं, चित्रपटातील व्यक्तिरेखा खऱ्या वाटणं हे आजच्या दिग्दर्शकांसमोरचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे माझा हिरो अमुक एक काम करतो असं नुसतं चिकटवून त्यांना चालत नाही. तर त्या क्षेत्राची एक झलक दाखवताना त्या व्यक्तिरेखेची धडपड, कामाचा संघर्ष-तणाव, यश या सगळ्या गोष्टींचा चित्रपटात तपशीलवार वापर करणंही त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं आहे.

‘दंगल’ हा तर रूढार्थाने चरित्रपट आहे. महावीर फोगट यांच्या आयुष्यावरचा हा चरित्रपट असला तरी त्यात महावीर फोगट यांची पैलवानी आणि त्यांच्या मुली गीता-बबिता यांची पैलवानी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या मांडताना आमिर खानबरोबरच गीता-बबिताची भूमिका साकारणाऱ्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनाही त्या पद्धतीचे प्रशिक्षण देणं, त्यांच्याकडून ते करून घेणं ही सगळ्यात मोठी जोखीम होती, असं दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. हिंदी चित्रपटात नायिकांनी पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका कित्येक वेळा साकारली आहे. तरीही ‘गंगाजल २’मधून प्रियांका चोप्रा जेव्हा पोलिस म्हणून समोर येणार होती तेव्हा तिचा अभिनय उत्तम आहे, याची खात्री असणाऱ्या दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासाठी शारीरिकदृष्टय़ाही प्रियांकाने तसं दिसणं हे जास्त महत्त्वाचं होतं. प्रियांकाने नुकताच ‘मेरी कोम’ चित्रपट पूर्ण केला होता. त्या चित्रपटासाठी तिने एका खेळाडूचं शरीर कमावलं होतं आणि माझ्यासाठी तिची ती तयारी हा मोठा फायदा होता. मी योग्य वेळी प्रियांकाकडून ती भूमिका करून घेतली होती. अर्थात केवळ नायिकेचं दिसणंच नाही तर त्या क्षेत्रातील बारकावे उभे करण्यासाठीही दिग्दर्शकांना दिवसरात्र मेहनत घ्यावी लागते आहे. ‘गंगाजल २’साठी प्रकाश झांनी कित्येक महिने उत्तर प्रदेशातील पोलिस ठाण्यांमध्ये काढल्याचं सांगितलं होतं. ‘सुलतान’सारख्या चित्रपटात सलमानला दोन वेगळ्या खेळांचं प्रशिक्षण घ्यावं लागलं. तसंच चित्रपटाची नायिका आरफा हीसुद्धा पैलवान असल्याने अनुष्कालाही कुस्तीचं प्रशिक्षण घ्यावंच लागलं. किंबहुना, नायिकेसाठी तसं खेळाडूचं शरीर असणं ही त्या वेळची गरज असल्याने ‘सुलतान’साठी नायिकेचा शोधही लांबला होता.

नव्वदनंतर आर्थिक बदल घडले हे खरं असलं तरी चित्रपटांमधून ते अंमळ उशिरानेच आले आहेत. त्या वेळी हिंदी चित्रपटांमधून नोकरीसाठी वणवण फिरणारा आणि ‘नो व्हेकन्सी’चा बोर्ड पाहून हताश होऊन मागे फिरणारा, चिडणारा, अंडरवर्ल्ड किंवा गुन्हेगारी जगतात शिरणारा नायकच पाहण्याची वेळ चित्रपटप्रेमींवर आली होती. यशराज, धर्मा प्रॉडक्शनच्या नव्या पिढीने सूत्रे हातात घेतली तेव्हा तर सगळंच गोडगोड आणि श्रीमंती वातावरणात लोळणारे नायक-नायिकाच प्रामुख्याने दिसत होते. मात्र ‘यशराज’चा नायक म्हणून कित्येक काळ हात पसरून नायिकांना साद घालत रिझवणारा शाहरूख खान कधी गाडय़ांचं गॅरेज सांभाळताना दिसतो. तर कधी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करतो. चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब असतात, हे आता म्हणणं सयुक्तिक ठरू शकेल इतक्या प्रभावीपणे आजूबाजूच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा वेध चित्रपटांमधून दिसतो आहे. आर. बाल्की दिग्दर्शित ‘की अँड का’सारख्या चित्रपटांचा इथे प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. जिथे नायिकेला कॉर्पोरेट करिअरचा बळी द्यायचा नाही म्हणून लग्न करायचं नाही आहे. त्यामुळे जेव्हा स्वत:हून मी घरगृहस्थी सांभाळेन म्हणणारा नायक तिच्या आयुष्यात येत नाही तोवर ती लग्नाचा विचारही करत नाही. आणि हाच घरगृहस्थी सांभाळणारा म्हणजे किराणा-भाजी आणण्यापासून इमारतीतील महिलांना जिमचे प्रशिक्षण देणारा नायक एक समुपदेशक म्हणून यशस्वी होतो. त्याला त्याचा नवा मार्ग सापडतो, हे चित्र काही वर्षांपूर्वी चित्रपटात पाहायला मिळणं कठीणच होतं. गायिका होण्यासाठी धडपडणारी, शिक्षण घेऊन मॉलच्या शोरूममध्ये काम करणारी, रेडिओ जॉकी बनण्यासाठी धडपडणारी, वकिली करणारी किंवा करणारा अशा कितीतरी क्षेत्रांमधून आजचे नायक-नायिका पडद्यावरही रोजी-रोटीसाठी धडपड करताना दिसताहेत. त्यामुळेच की काय आत्ताचे चित्रपट हे आजच्या पिढीला जास्त आपले वाटू लागले आहेत.