|| रेश्मा राईकवार

एक उत्तम प्रायोगिक नाटक आणि एक तद्दन व्यावसायिक नाटक यात जे अंतर असतं ते ‘द बिग बुल’ पाहिल्यावर ठळकपणे लक्षात येतं. नाटक आणि चित्रपट दोन वेगवेगळी माध्यमे असली तरी इथे त्याचा दाखला द्यावा लागतो कारण सध्या असे काही वेगळे प्रवाह चित्रपटांमध्ये तरी फारसे पाहायला मिळत नाहीत. हंसल मेहतासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाची ‘स्कॅम १९९२’ ही वेबमालिका पाहिल्यानंतर आणि ती डोक्यावर घेतल्यानंतर ‘द बिग बुल’मध्ये यापेक्षा काही वेगळे पाहायला मिळेल अशी फारशी अपेक्षा नव्हती. मात्र वेगळे काही देण्यापेक्षा वाईट तेवढेच देणाऱ्या ‘द बिग बुल’ची ‘स्कॅ म १९९२’शी तुलना अटळ होती. तुलनात्मक विचार करायचा नाही असे ठरवले तरी हा चित्रपट म्हणजे निव्वळ भ्रमाचा भोपळा ठरला आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

नव्वदच्या दशकांत सर्वसामान्यांना झटपट पैसे कमावण्यासाठी शेअर बाजाराचा फंडा लक्षात आणून देणाऱ्या ‘बिग बुल’ हर्षद मेहता याच्या आयुष्यावर ‘द बिग बुल’ हा चित्रपट आधारलेला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात याच विषयावरची ‘स्कॅ म १९९२’ ही वेबमालिका प्रदर्शित झाली. अजूनही या वेबमालिके चा लोकांवरील प्रभाव ओसरलेला नाही, गंमत म्हणजे या वेबमालिके च्या नावात कु ठेही ‘बिग बुल’चा साधा उल्लेखही नाही. पण विषयाशी आणि कथानायकाशी प्रामाणिक राहात अगदी हर्षद मेहता या नावासह खरीखुरी पात्रे आणि त्यांची घडलेली गोष्ट रंगवत त्यातून जे सांगायचे आहे ते लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात हंसल मेहता यशस्वी ठरले आहेत. त्याउलट गत या चित्रपटाची आहे. चित्रपटाच्या नावातच ‘द बिग बुल’ आहे, पण आपण कथा पाहतो ती मात्र कोण्या हेमंत शहाची. हर्षद मेहताचीच कथा आहे हे सांगण्याचे धाडसही दिग्दर्शकाने के लेले नाही, उलट ही काल्पनिक कथा आहे असे दिग्दर्शकाने जाहीर केले आहे. या काल्पनिक कथेतील पात्रं आणि त्यांच्याबरोबर घडलेले प्रसंग हे अगदी खरे आहेत हा योगायोग समजूनच आपण चित्रपट पाहायला सुरुवात करायची. तर या काल्पनिक कथेतला हेमंत शहा पाहताना मणिरत्नम दिग्दर्शित ‘गुरू’ची आठवण झालीच तर तीही दिग्दर्शकाची नाही फारतर अभिषेक बच्चनची चूक आहे असे म्हणावे लागेल. शेअर बाजारातून सापडलेला कोटय़धीश बनण्याचा मार्ग हेमंत शहाने अचूक पकडला. त्याने स्वत:हून घोटाळा के लाच नाही, त्याने फक्त व्यवस्थेतल्या कच्च्या दुव्यांचा वापर करत आपली स्वप्न पूर्ण के ली, असे सांगण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो.

मुळात जे जसे घडले ते सांगण्याचाही प्रयत्न इथे लेखक-दिग्दर्शक जोडीने के लेला नाही. सत्तर एमएमचा पडदा लक्षात घेऊन के लेल्या या चित्रपटामागचा दिग्दर्शकीय दृष्टिकोनही तितकाच तद्दन मसालापटांच्या चौकटीतला आहे हे चित्रपट पाहताना वारंवार जाणवत राहते. त्यामुळे नायकाच्या करामतीपेक्षा त्याची जीव नसलेली प्रेमकथा महत्त्वाची ठरते. नातेसंबंधांवरच भर द्यायचा तर हेमंत आणि त्याचा भाऊ जे पहिल्या फ्रे मपासून एकत्र दिसतात. त्या दोघांमधील नात्यावरही भर देता आला असता किं वा तोच पदर घेऊन कथा फिरवता आली असती. तसा प्रयत्न दिग्दर्शकाने के ला आहे खरा.. पण तोही फक्त एक धक्कातंत्र म्हणून वापरायचा निष्फळ प्रयत्न ठरला आहे. त्यातही दिग्दर्शकाला संगती साधता आलेली नाही. एका क्षणी हेमंतची गाडी चुकीच्या दिशेने भरधाव निघाली आहे याची जाणीव भावाला होते, त्याला रोखले पाहिजे नाहीतर आपणही गाळात जाणार या भीतीने विचारात पडलेला भाऊ एका फ्रे ममध्ये दिसतो. ते दृश्य मध्येच कट होते, दुसऱ्या फ्रे ममध्ये तोच भाऊ पुन्हा हेमंतसमोर दिसतो. या तोडलेल्या दृश्याची संगती शेवटी भावाकडून त्याचे सत्य हेमंतला कळते तेव्हा आपल्याला लागते. (अर्थात तुम्हाला ते आधीचे दृश्य आठवले किं वा संगती लावावीशी वाटली तरच..) नाहीतर इतर सगळ्या भडकपणे मांडलेल्या नाटय़मय चित्रणाप्रमाणे हेही दृश्य आपल्या नजरेसमोरून पुढे सरकलेले असते. हेमंत हा सर्वसामान्य तरुण आहे, तो महत्त्वाकांक्षी आहे, हुशार-चलाख आहे हे सगळे दिग्दर्शक पहिल्यापासून मांडतो. मग अचानक ‘द बिग बुल’ बनल्यानंतर हेमंतला अचकटविचकट हसताना दाखवूनही दिग्दर्शकाने काय साधले हे कळत नाही.

अत्यंत भडक मांडणी असलेल्या या चित्रपटात हेमंतची आई आणि भाऊ या दोन्ही भूमिके त ताकदीचे कलाकार दिग्दर्शकाकडे होते. सोहम शहा पहिल्या फ्रे मपासून अभिषेक बच्चनबरोबर आहे, मात्र तरीही त्याला स्वतंत्र अस्तित्व देण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. इलियानाची व्यक्तिरेखाही अशीच गोंधळात टाकणारी आहे. त्यातल्या त्यात अभिनेता राम कपूरने अभिषेक बच्चनबरोबरच्या पहिल्याच प्रसंगात आपली ताकद दाखवून दिली आहे. अभिषेक बच्चनला पाहून ‘गुरू’ चित्रपटाचा दुसरा भाग सुरू असल्यासारखे वाटते. हेमंतचा बराचसा भाग हा गुरूभाईच्याच वळणाने जाणारा असल्याने तो धागा अचूकपणे अभिषेकने पकडला आहे, मात्र मध्येच त्याच्या व्यक्तित्वाला दिलेला ‘खल’ स्पर्श त्याची पुरती दाणादाण उडवतो, पुन्हा शेवटाकडे येताना त्याने त्याच प्रामाणिकपणे आपली भूमिका साकारली आहे. तरीही हा त्याचा उत्तम चित्रपट म्हणता येणार नाही. त्यामानाने ‘मनमर्जिया’मध्ये छोटेखानी भूमिके तही त्याची चांगली छाप पडली होती. अर्थात, कथेत आणि दिग्दर्शनातच विसविशीत असलेला हा चित्रपट कलाकारांनी तरी किती सावरून घ्यावा?

द बिग बुल

दिग्दर्शक – कु की गुलाटी

कलाकार – अभिषेक बच्चन, इलियाना डिक्रुझ, सोहम शहा, सुप्रिया पाठक, निकिता दत्त, सौरभ शुक्ला, राम कपूर.