सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७१ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. सरोज खान यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कलाविश्वातील अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत आहेत. सरोज खान यांनी आजवर बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

गेल्या बऱ्याच काळापासून त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु २०१९ मध्ये अभिनेत्री आलिया भट्टचा मल्टिस्टार चित्रपट ‘कलंक’ आणि कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या दोन चित्रपटांमधील एक-एक गाणे त्यांनी कोरिओग्राफ केले होते. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या.

सरोज खान यांनी १९८८ मध्ये तेजाब या चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणे कोरिओग्राफ केले होते. अभिनेत्री माधुरी दिक्षितचे हे गाणे त्यावेळी अतिशय हिट झाले होते.

१९८७ साली त्यांनी मिस्टर इंडिया चित्रपटातील हवा हवाई हे गाणे कोरिओग्राफ केले होते.

२००२ मध्ये ‘देवदास’ हा चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटातील ‘डोला रे’ हे गाणे आजही लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते.

‘सैलाब’ १९९० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘हमको आज कल है’ हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते.

मिस्टर इंडिया चित्रपटातील ‘काटे नही कट ते’ हे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केलेले गाणे हिट ठरले होते.

१९९४ मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील निंबोडा हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले आहे.

बेटा चित्रपटाली धक धक हे हिट गाण्यांच्या यादीमधील एक आहे. ते देखील सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले आहे.

१९९३ मध्ये प्रदर्शित झालेले ‘बाजीगर’ या चित्रपटातील ये काली काली आँखे या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले आहे.

१९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसंच सरोज खान यांना आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे.