देशात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी मोठ्या प्रमाणावर लसीकरण देखील सुरु आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये करोना लस देण्यात येत आहे. पण लसींच्या तुटवड्यामुळे लस घेण्यासाठी रेजिस्ट्रेशन करणे आणि स्लॉट बूक करणे थोडे कठीण झाले आहे. अशातच करोना लस घेण्यासाठी काहींनी बनावट ओळखपत्र तयार केल्याचा प्रकार समोर आला. आता अभिनेत्री सौम्या टंडनने देखील लस घेण्यासाठी बनावट ओळखपत्र तयार केल्याचे म्हटले जात आहे.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारणारी सौम्या टंडनवर बनवाट ओळपत्र दाखवून करोना लस घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाण्यातील एका लसीकरण केंद्रामध्ये जाऊन सौम्याने बनावट ओळखपत्र दाखवून लसीचा पहिला डोस घेतल्याचे म्हटले जात आहे. आता सौम्याने यावर प्रतिक्रिया देत हे सर्व खोटं असल्याचे सांगितले आहे.

आणखी वाचा : ‘फ्रीमध्ये मनोरंजन करु नका’, कविता कौशिकचा करण- निशाला अप्रत्यक्ष टोला

सौम्याने या संदर्भात एक ट्वीट केले आहे. ‘मी बनवाट ओळखपत्र दाखवून ठाण्यातील एका लसीकरण केंद्रातून लसीचा पहिला डोस घेतला असल्याचे म्हटले जात आहे. हे खोटं आहे. मी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे पण माझ्या घराजवळील लसीकरण केंद्रात घेतला आहे. तेही सर्व प्रक्रिया केल्यानंतर. कृपया अशा कोणत्याही खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका’ या आशयाचे ट्वीट सौम्याने केले आहे.

यापूर्वी ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्राने बनवाट ओळपत्र दाखवून लसीचा पहिला डोस घेतल्याची बाब समोर आली होती. मीराने लसीकरणावेळीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. पालिकेच्या करोना रुग्णालयामध्ये पर्यवेक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून मीराने लस घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता.