‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून लाखों प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री भाग्यश्री आता पुन्हा चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. ती लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत काम करण्यापूर्वी त्याचा बाहुबली हा चित्रपट पाहिल्यावर त्याच्या विषयी एक वेगळे मत तयार झाल्याचे भाग्यश्रीने सांगितले आहे.
नुकताच एका मुलाखतीमध्ये भाग्यश्रीने हा खुलासा केला आहे. ‘बाहुबली हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रभासची माझ्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. पण तो एकदम साधा व्यक्ती आहे. तो एक टीम प्लेअरसारखा आहे आणि प्रत्येकासोबत आपले वेगळे नाते तयार करतो’ असे भाग्यश्री म्हणाली.
तसेच या मुलाखतीमध्ये भाग्यश्रीने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यावर देखील वक्तव्य केले. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी याने पुन्हा चित्रपटात काम करण्यासाठी प्रेरणा देली असल्याचे भाग्यश्रीने म्हटले.
‘राधे श्याम’ या चित्रपटात पूजा आणि प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन हे कलाकार देखील दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त भाग्यश्री अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘थलाइवी’ या चित्रपटात देखील भूमिका साकारणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 4:38 pm