महाराष्ट्राचं सर्वात लाडकं व्यक्तीमत्त्व आणि तमाम वाचकांचे लाडके लेखक पुलं. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. एकीकडे हा चित्रपट पाहाण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत, तर दुसरीकडे पुलं.च्या याच महाराष्ट्रात त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालीये. सध्याच्या घडीचं हे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. मुंबई- पुणे सारख्या महत्त्वाच्या शहरातील स्क्रीन मालकांनी हा चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे. पुलंचा या दोन्ही शहरांशी खास ऋणानुबंध जोडला होता. मात्र असं असताना त्यांच्या बायोपीकला एका हिंदी चित्रपटासाठी स्क्रीन देण्यास नकार दिला जातो हे वास्तव तमाम मराठी प्रेक्षकांसाठी अत्यंत निराशाजनक आहे.

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’चे मुंबई आणि उपनगरातील जवळपास ११८ मिल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवर शो सुरू आहेत. मात्र ४ जानेवारील प्रदर्शित होणाऱ्या ‘भाई’ चित्रपटाला महाराष्ट्रातील दोन्ही महत्त्वाच्या शहरात घरघर लागली आहे. दक्षिण मुंबईतील १८, पश्चिम मुंबईत २० आणि नवी मुंबईतील ७ अशा एकूण ४५ चित्रपटातगृहात ‘भाई’चे शो आहेत हा आकडा ‘सिम्बा’ला देण्यात येणाऱ्या स्क्रीनच्या तुलनेत खूपच कमी आहे. पुण्यातही हेच चित्र आहे. पुण्यातील एकूण २१ हून अधिक मिल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवर ‘सिम्बा’चे वेगवेगळ्या वेळेत शो ठेवण्यात आले आहेत. तर ‘भाई’साठी हा आकडा कमी आहे पहिल्याच दिवशी १९ आणि मग १७ चित्रपटगृहात ‘भाई’ दाखवण्यात येणार आहे.

२८ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. देशभरातील ४ हजारांहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आतापर्यंत एकूण १३९ कोटींची कमाई केली आहे. यातले तब्बल ५० कोटी हे मुंबईतील चित्रपटगृहातून ‘सिम्बा’नं कमावले आहे. म्हणूनच या चित्रपटासाठी जास्तीत जास्त स्क्रीन मिळाव्या यासाठी ‘सिम्बा’चे वितरक चित्रपटगृहांच्या मालकावर दबाव टाकत असल्याचं समजत आहे.

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची एक कलाकृती येत असताना त्याचे स्वागत व्हायला हवे. विद्येच्या माहेरघरात अर्थात पुण्यात तर पुलंचं दीर्घकाळ वास्तव्य होतं. तिथेही त्यांच्यावरच्या चित्रपटाला स्क्रीन्स मिळू नये ही लाज वाटण्याचीच बाब आहे. याचमुळे चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजेरकर म्हणत आहेत होय मला लाज वाटते आहे मला मी मराठी असल्याची! हा फक्त पुलंवरच्या चित्रपटाचा प्रश्न नाही तर मराठी चित्रपटांमध्ये विविध वेगळे विषय मांडले जात असतानाही त्यांना न्याय मिळत नाही. त्याविरोधात कोणी आवाजही उठवत नाही, राज ठाकरे यांचा अपवाद वगळला तर एकाही मराठी नेत्याला मराठी सिनेमाबाबत कळकळ नाही. तसे असते तर असे घडलेच नसते असं म्हणत महेश मांजरेकर यांनी आपली खंत बोलून दाखवली.