ईद व सलमान खानचा चित्रपट हे जणू आता समीकरणच झालं आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटाची भेट आणतो. यंदाही त्याचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दणक्यात कमाई केली आहे.

‘भारत’ने बुधवारी तब्बल ४२.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘भारत’ अग्रस्थानी आहे. ‘कलंक’, ‘केसरी’ ‘गली बॉय’, ‘टोटल धमाल’ या चित्रपटांना ‘भारत’ने मागे टाकलं आहे. याआधी सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने ३४.१० कोटी तर ‘सुलतान’ने ३६.५४ कोटी रुपये कमावले होते. हे दोन्ही चित्रपट अली अब्बास जफरनेच दिग्दर्शित केले होते. ‘भारत’ देशभरातील ४७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘भारत’च्या प्रदर्शनाच्या दिवशीच विश्वचषकाचा भारताचा पहिला सामना होता. त्यामुळे या सामन्याचा कमाईवर परिणाम होईल असा अंदाज होता. याआधी प्रदर्शित झालेले ‘ट्युबलाइट’, ‘रेस ३’ हे सलमानचे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्या तुलनेत ‘भारत’च्या कमाईमुळे सलमानला दिलासा मिळू शकेल.

वाचा : ‘तुला पाहते रे’ मालिकेनंतर काय असेल गायत्रीचा प्लान?

‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. १९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. यामध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचा भरणा आहे.