सलमान खान व कतरिना कैफ यांचा ‘भारत’ हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाने भरघोस कमाई केली. पण, सहाव्या दिवशी मात्र या चित्रपटाची कमाई कमी झाली आहे. सोमवारी या चित्रपटाने फक्त ९ ते १० कोटी रूपयांची कमाई केली आहे. रविवारी केलेल्या कमाईपेक्षा ५५ टक्के घट झाली आहे. सहा दिवसात या चित्रपटाने १६० कोटी रुपये कमावले आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार ‘भारत’ देशभरातील ४७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. सोमवारी या चित्रपटाने केलेल्या कमाईविषयी तरण आदर्शने ट्विट केले आहे. ‘भारत’ने आतापर्यंत बुधवार- ४२.३० कोटी रुपये, गुरुवार- ३१ कोटी रुपये, शुक्रवार- २२.२० कोटी रुपये, शनिवार- २६.७० कोटी रुपये, रविवार- २७.९० कोटी रुपये व सोमवारी ९.२० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतीच २०१९ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यादीनुसार ‘भारत’ दुसऱ्या स्थानावर आहे.

१९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. यामध्ये रोमान्स, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन या सगळ्यांचा भरणा आहे. ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.