12 December 2019

News Flash

सलमानचा ‘भारत’ दोनशे कोटींच्या क्लबमध्ये

तुफान कमाईची घोडदौड सुरू ठेवत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

सलमान खान

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. हा चित्रपट ५ जून म्हणजेच ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. पहिल्याच काही दिवसांमध्ये तुफान कमाई करत आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसचा ‘सुलतान’ सलमानच आहे हे या चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने नुकतंच एक ट्विटकरून याविषयीची माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे की, ‘ ‘भारत’ने बॉक्स ऑफिसवर डबल सेंच्युरी केली आहे. दुसऱ्या आठवड्यात ‘भारत’ने शुक्रवारी ४.३० कोटी, शनिवारी ६.३७ कोटी, रविवारी ६. १९ कोटी, सोमवारी २.६३ कोटी, मंगळवारी २.३२ कोटी तर एकूण २०१.८६ कोटी रुपये कमावले आहेत.’

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार ‘भारत’ देशभरातील ४७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. सलमानचे या आधी प्रदर्शित झालेले ‘ट्युबलाइट’, ‘रेस ३’ हे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्या तुलनेत ‘भारत’च्या कमाईमुळे सलमानला दिलासा मिळू शकेल. चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सलमानने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

१९४७ सालच्या फ्लॅशबॅकमध्ये रंगविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचं होणारं विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याच्या जीवनाशी सुरु असलेला संघर्ष रंगविण्यात आला आहे. ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.

First Published on June 19, 2019 7:05 pm

Web Title: bharat salman khan katrina kaif 200 crore djj 97
Just Now!
X