छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीच्या वडिलांचे निधन झाले. ११ मे रोजी भव्यच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू झाला. आता भव्यने वडिलांच्या आठवणीमध्ये एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

भव्यने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सर्वांचे आभार मानले आहे. ‘९ एप्रिल रोजी माझ्या वडिलांना करोना झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी ते नेहमीच कारणीभूत होते आणि कायम असतील. माझे वडील स्वत:ची नेहमी काळजी घ्यायचे. बाबा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आनंदी असाल. मला तुमची कायम आठवण येईल’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘ज्याच्यासोबत घडते, तोच समजू शकतो’, ‘गोगी’ने वाहिली टप्पूच्या वडिलांना श्रद्धांजली

पुढे भव्यने पोस्टमध्ये सोनू सूदचे आभार मानले आहेत. ‘माझ्या वडिलांची काळजी घेतलेल्या डॉक्टर, नर्स आणि इतर सर्वांते आभार मानतो. सोनू सूद सर तुमचे देखील आभार. आमच्या कठीण काळात मदत केलेल्या सर्वांचे आभार.’

मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात गेल्या १० दिवसांपासून भव्यच्या वडिलांवर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि दोन मुले निश्चित आणि भव्य असा परिवार आहे.