बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब, मरीना बीच, एमिरेट्स टॉवर या दुबईतील खास लोकेशन्सवर नुकतेच भय या चित्रपटातील २ गाण्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत ‘भय’ या चित्रपटातील शेखर अस्तित्व यांनी लिहिलेल्या ‘साजणा’ आणि ‘मी आलो’ या दोन गीतांना ब्रिजेश शांडिल्य आणि तुलिका उपाध्याय यांच्या सुमधूर आवाजात स्वरबद्ध केलय. विक्रम मोन्त्रोस यांच्या संगीतावर स्मिता गोंदकर, अभिजीत खांडकेकर, संस्कृती बालगुडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी ताल धरलाय. तसेच नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर, सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आणि दिग्दर्शक-संकलक राहुल भातणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही गाणी हटक्या पद्धतीने शूट केली गेली असून विशेष म्हणजे क्रुझ-हेलिपॅडवरील दृश्ये आणि दुबईतील प्रसिद्ध बीचेसची अनोखी सफर या गाण्यांद्वारे रसिक-प्रेक्षकांना करता येणार आहे.
सतत कशाना कशाची तरी भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना काय अडचणींना तोंड द्यावं लागतं याचा गुंगवून टाकणारा प्रवास दर्शवणारा ‘भय’ पॅरानॉईड स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजारावर भाष्य करतो. या चित्रपटाची कथा-पटकथा-संवादाची जबाबदारी नितीन सुपेकर यांनी सांभाळली आहे. अभिजीत खांडकेकर,सतीश राजवाडे, उदय टिकेकर,विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, स्मिता गोंदकर आणि संस्कृती बालगुडे अभिनित ‘भय’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.