प्रसिद्ध अभिनेते नरेंद्र झा यांनी बुधवारी पहाटे पाच वाजता आपल्या फार्म हाऊसवर अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. ५५ वर्षीय या हरहुन्नरी अभिनेत्याच्या मृत्यूवर बॉलिवूडमधून अनेकांनी दुःख व्यक्त केले. दरम्यान, भोजपूरी सुपरस्टार रवि किशनने एक ट्विट करुन नरेंद्र झा त्यांच्या फार्म हाऊसवर काय करत होते याबद्दलची माहिती शेअर केली. रविने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘तुमच्या आत्म्याला शांती मिळो. तुम्ही तुमच्या फार्म हाऊसवर आम्हाला जेवायचं आमंत्रण देणार होता आणि अचानक… ही फार दुःखद घटना आहे. तुम्ही अशाप्रकारे तुमच्या जुन्या मित्रांना दगा देऊ शकत नाही.’

सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार म्हणून नरेंद्र यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांनी शाहिद कपूरसोबत हैदरमध्ये, शाहरुख खानसोबत रईसमध्ये, सनी देओलसोबत घायल- वन्स अगेन तसेच हमारी अधुरी कहानी, फोर्स- २, काबिल अशा अनेक सिनेमांत बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. सध्या ते सलमान खान आणि बॉबी देओल यांची मुख्य भूमिका असलेल्या रेस- ३ सिनेमाचे चित्रीकरण करत होते.

जाहिरातींमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारे नरेंद्र झा टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नाव होतं. हिंदीव्यतिरिक्त तामिळ, तेलुगू भाषांमधील चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. निर्माती एकता कपूरनेही नरेंद्र यांच्या आकस्मित मृत्यूवर दुःख व्यक्त केलं. एकताने ट्विट करत म्हटले की, ‘कॅप्टन हाऊसपासून इतिहासपर्यंत नरेंद्र हा पहिला कलाकार होता ज्याच्यासोबत मी काम केले.’

जवळपास ७० मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. टीव्ही मालिकांबद्दल बोलायचं झाल्यास नरेंद्र झा यांनी ‘बेगुसराय’, ‘छूना है आसमान’, ‘संविधान’ सारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. नरेंद्र झा यांच्या निधनाच्या वृत्तामुळे बॉलिवूडकरांना धक्का बसला आहे. काही दिवसांपुर्वीच श्रीदेवी, शम्मी आंटी आणि आता नरेंद्र झा यांचं निधन झाल्याने बॉलिवूडकर चिंतेत आहेत. नरेंद्र झा यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. २०१५ मध्ये नरेंद्र झा यांनी सेन्सॉर बोर्डाच्या माजी सीईओ पंकजा ठाकूर यांच्याशी लग्न केलं होतं.