गर्भनिरोधकाच्या – कंडोमच्या जाहिराती दिवसाउजेडीच काय, पण रात्री दहा वाजता घराघरांत सामसूम होईपर्यंत दाखविण्यास बंदी घालण्याचे निर्देश स्मृती इराणी यांच्या माहिती-प्रसारण खात्याने दिले आहेत. या जाहिराती खासकरून लहान मुलांच्या दृष्टीने असभ्य आहेत. त्यांच्यात ‘अनारोग्यकारक वर्तना’प्रति आकर्षण निर्माण करणाऱ्या आहेत. सबब त्या त्यांच्या दृष्टीस पडू नयेत, अशी इराणी यांची यामागची भावना आहे. मात्र, माहिती-प्रसारण खात्याचा हा निर्णय अभिनेत्री रिचा चड्ढाला पटला नसल्याचे दिसते.

वाचा : काही पत्रकार फुकटची दारु प्यायला येतात; ऋषी कपूर यांचे वादग्रस्त विधान

‘द क्वीण्ट’ या यू-ट्यूब चॅनलवर रिचाने नुकतेच कंडोम जाहिरात बंदीवर आपले मत व्यक्त केले. ‘आपण जगात लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहोत, तर आपल्यापुढे म्हणजेच पहिल्या क्रमांकावर चीन आहे. मग तुम्हीच सांगा आपल्याला चीनच्या पुढे जायचे आहे की नाही?’ अशी उपरोधिक टीका करत रिचा एवढ्यावरच थांबली नाही तर मेडिकलमध्ये सॅनिटरी पॅड घेण्यासाठी गेलेल्या मुलीपेक्षा कंडोम खरेदी करणारा मुलगा अधिक धास्तावलेला असतो असेही तिने म्हटले.

वाचा : पुरस्कार सोहळ्यातील प्रत्येक मिनिटासाठी प्रियांका चोप्रा घेते एवढे मानधन?

कंडोमच्या जाहिरातींसाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. यानुसार, कंडोमच्या जाहिराती रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच टीव्हीवर दाखवता येणार आहेत. एड्सला रोखण्यासाठी गर्भ निरोधक आणि कंडोमचा वापर करावा, अशी जनजागृती सरकारकडून केली जाते. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मोफत कंडोमचे वाटपदेखील केले जाते. मात्र लहान मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम लक्षात घेत या जाहिराती दाखवण्यावर निर्बंध आणले आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे.