सीतेच्या दृष्टिकोनातून रामायण अशी नवी संकल्पना घेऊन येणारी ‘सिया के राम’ ही नवी मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर दाखल होते आहे. ‘रामायण’ अनेकदा छोटय़ा पडद्यावरून नव्या नव्या चेहऱ्यांच्या रूपात येऊन गेले आहे. मात्र, अजूनही या महाकाव्याचे आकर्षण पिढय़ान्पिढय़ा कायम आहे. नव्याने ‘रामायण’ लोकांसमोर आणताना ते सीतेच्या दृष्टिकोनातून मांडण्याची किमया आनंद नीलकंतन आणि सुब्रत सिन्हा या नव्या पिढीच्या लेखकांनी साधली आहे. या मालिकेच्या निमित्ताने मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले पहिल्यांदाच हिंदीच्या छोटय़ा पडद्यावर, मोठय़ा मालिकेत दिसणार आहे. जनक राजाची पत्नी, सीतेची आई राणी सुनयना हिची भूमिका भार्गवी साकारत असून ‘सिया के राम’ ही कारकीर्दीच्या या टप्प्यावर एक आगळे समाधान देणारी मालिका असल्याचे भार्गवीने ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.

‘रामायण’ हा शब्द तोंडातून बाहेर पडला तरी आपल्यासमोर पौराणिक कथा, मग त्यावर आधारित मालिकांची एक ठरीव शैली आणि त्यानुसार त्यातील पात्रे नजरेसमोर येतात. ‘सिया के राम’ ही मालिका त्याला अपवाद असल्याचे भार्गवी सांगते. मुळात, या मालिकेला केवळ तिचा संदर्भ पुराणकाळातील आहे म्हणून पौराणिक मालिका म्हणणे चुकीचे ठरेल, असे तिला वाटते. आत्तापर्यंत मालिकांमधून, पौराणिक आणि अगदी आजच्या काळातील साहित्यातूनही सीतेची कहाणी ही स्वयंवरापासून आपल्याला माहिती आहे. त्याच्याआधी जनकराजाला सीता भूमातेच्या उदरात सापडली आणि मग त्याने तिचे पालनपोषण केले, हा एकच संदर्भ तिच्या जन्मापासूनचा आपल्याला माहिती असतो. ‘सिया के राम’मध्ये पहिल्यांदाच सीता लहानाची मोठी कशी झाली? तिच्यावर झालेले संस्कार, तिच्या आजूबाजूचे वातावरण या सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्ण रीतीने मांडण्यात आल्या आहेत. किंबहुना, सीतेच्या दृष्टिकोनातून ‘रामायणा’ची कथा पहिल्यांदाच लोकांसमोर येणार असल्याचे भार्गवीने सांगितले.
भार्गवीने स्वत: यात सीतेच्या आईची राणी सुनयनाची भूमिका केली आहे. त्या काळी स्त्रियांना स्वत:चे असे मत नव्हते, त्या केवळ राजाची राणी म्हणून वावरायच्या असा आपला समज आहे. हा समज या मालिकेतून खोटा पडेल, असा विश्वास तिने व्यक्त केला. मर्यादा पुरुषोत्तम रामाची पत्नी सीता सुसंस्कारी होती. तिच्या हुशारीचे, संस्कारांचे कौतुक केले जाते. हे संस्कार तिला तिच्या आईवडिलांकडून मिळाले आहेत. सीता ही तिच्या आईची सावलीच होती जणू.. अशा पद्धतीने तिचे आणि तिच्या आईचे नाते या मालिकेत पाहायला मिळणार असल्याचे भार्गवीने सांगितले. या मालिकेसाठी वेशभूषाही वेगळ्या पद्धतीची आहे. पौराणिक मालिकांप्रमाणे भरजरी वस्त्र, दागदागिने यांनी मढलेली पात्रे यात पाहायला मिळणार नाहीत. सर्वसामान्यांना आपलेसे वाटतील, अशा पद्धतीने जनक राजा आणि राणी सुनयना यांची वेशभूषा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती तिने दिली. सध्या या मालिकेचे चित्रीकरण भुज, मुंबई आणि हैद्राबादमध्ये करण्यात आले आहे. लवकरच भुतानमध्येही चित्रीकरण होणार आहे, असे भार्गवीने सांगितले. ‘सिया के राम’ या मालिकेत भार्गवीबरोबर अभिनेता बिजॉय आनंद राजा जनकाच्या भूमिकेत, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहिल हे राजा दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत.