अमिताभ बच्चन ट्विटरवर खूप सक्रिय असतात, हे तुम्हाला माहितच असेल. चित्रपटाचे पोस्टर, सुविचार, किंवा रंजक व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या ट्विटला क्षणार्धात हजारो लाइक्स मिळतात आणि त्यावर प्रतिक्रियांचाही पाऊस पडतो. अशाच त्यांच्या एका पोस्टवर अभिनेत्री भूमी पेडणेकरने कमेंट केली. मात्र भूमीच्या ट्विटमधला एक शब्द बिग बींना समजलाच नाही. त्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.

अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टवर भूमीने कमेंट केली, ‘४४ वर्षे होऊन गेली आणि आताही तुम्ही इतक्या अविस्मरणीय भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येता.. मी सांगते तुम्ही खरंच ‘बॉलर’ आहात.’ भूमीच्या या ट्विटमधील ‘बॉलर’ हा शब्द बिग बींना समजला नाही. त्यांनी तिला विचारलं, ‘अरे भूमी.. हे बॉलर काय आहे? कधीपासून विचारतोय, कोणीच सांगत नाहीये.’

बिग बींच्या या ट्विटनंतर काही नेटकऱ्यांनी त्यांना या शब्दाचा अर्थ समजावून सांगितला. ‘बॉलर’ म्हणजे प्रभावशाली, उत्तम, दमदार असे अर्थ नेटकऱ्यांनी सांगितले. बिग बींनी ४४ वर्षांपूर्वीचा एका चित्रपटातील स्वत:चा फोटो आणि आताच्या चित्रपटातील भूमिकेचा फोटो पोस्ट केला होता. त्यावरून ही चर्चा सुरू झाली होती.

बिग बी लवकरच ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका आहे.