‘दम लगा के हैशा’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘शुभमंगल सावधान’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे भूमि पेडणेकर. दम लगा के हैशा या चित्रपटाच्या माध्यमातून भूमिने कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटाच्या काही आठवणीने तिने अलिकडेच फिल्टर कॉफी या शोमध्ये सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात तिची सहकलाकार असलेल्या सीमा पहवा यांच्या घरी भूमिला घरकाम करावं लागलं होतं असंही भूमिने या शोमध्ये सांगितलं.

अभिनेत्री म्हणून कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी भूमि यशराज फिल्म्समधील कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांच्यासोबत काम करत होती. २०१५ मध्ये भूमिने ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेत्री सीमा पहवा या तिच्या सहकलाकार होत्या. त्यामुळे भूमि त्यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवत होती. विशेष म्हणजे या ट्रेनिंगचा भाग म्हणून भूमिला सीमा यांच्या घरी चहा करणं, घरातील केर काढणं (झाडू मारणं) अशी लहानमोठी कामंदेखील करावी लागली होती.

“दम लगा के हैशाच्या निमित्ताने माझी आणि सीमा पहवा यांची पहिली भेट झाली. त्यांनी मला अभिनयाचे धडे शिकविले. ज्यादिवशी माझी आणि सीमा यांची भेट झाली त्यावेळी उद्या येताना सलवार कमीज ( ड्रेस) घालून ये असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून चहा करुन घेणे, घरातील केर काढणे अशी कामं करुन घेतली. जवळपास एक महिना मी हेच काम करत होते. त्यावेळी हे खरं आयुष्य आहे याची मला जाणीव झाली. आतापर्यंत मी माझ्याच विश्वात जगत होते. त्यामुळे मला माझ्या कोषातून बाहेर पडण्याची आणि खऱ्या अर्थाने जीवनातील अन्य अनुभव घेण्याची गरज आहे हे लक्षात आलं आणि हे सीमा पहवा यांच्यामुळे शक्य झालं”, असं भूमि म्हणाली.

पुढे ती म्हणते, “२०१६ पासून मी माझ्या घरी गेलेच नव्हते. मात्र, या लॉकडाउनच्या काळात मला ४ वर्षानंतर घरी जाण्याची संधी मिळाली. खरं तर या काळात सुद्धा मी शुटींग मिस करते. मात्र, तरीदेखील हा काळ मी मनापासून एन्जॉय करते. २०१६ पासून मी सातत्याने शुटींगमध्ये बिझी आहे. दम लगा के हैशानंतर मी सहा महिने ब्रेक घेतला आणि त्यानंतर परत शुटींग सुरु झालं. मला खरंच या सगळ्यातून बाहेर येऊन खऱ्या जीवनाचादेखील अनुभव घ्यायचा आहे”.

दरम्यान, ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटात सीमा पहवा आणि भूमि या दोघींनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात सीमा यांनी भूमिच्या आईची भूमिका साकारली होती. तसंच बाला चित्रपटातदेखील या दोघींनी एकत्र काम केलं आहे.