ग्रामीण पार्श्वभूमीवरील ‘स्पोर्ट्स फिल्म’चं दिग्दर्शन

चित्रपट, टीव्ही मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमातून आपल्या सकस अभिनयानं स्वत:चं स्थान निर्माण केलेला अभिनेता मिलिंद शिंदे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत नवा प्रयत्न करतोय. त्याच्या नव्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप गुलदस्त्यात असून ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका स्पोर्ट्स फिल्मचं दिग्दर्शन तो करतो आहे. राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची निर्मिती केली असून, चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद किरण बेरड यांनी लिहिले आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग शिर्डी येथे सुरु आहे.

मिलिंद शिंदे यांनी या पूर्वी ‘नाच तुझंच लगीन हाय’ आणि ‘भिडू’ या दोन चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘नाच तुझंच लगीन हाय’ हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकल्यानं अद्याप प्रेक्षकांपुढे आलेला नाही. तर ‘भिडू’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मिलिंद आता नव्या चित्रपटाकडे वळला आहे. मराठी चित्रपट रसिकांसाठी थोडा वेगळा विषय या चित्रपटातून मांडला जाणार आहे. शिवछत्रपती पुरस्कारात डावललेला एक खेळाडू काही कारणानं आपल्या गावी परत जातो. गावात चोरी करणाऱ्या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करून तो त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत कसं नेतो, याची अनोखी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या निमित्तानं मराठीत बऱ्याच काळानं स्पोर्ट्स फिल्मची निर्मिती होत आहे.

‘खेळावर आधारित एक कथानक हाताळताना वेगळा आनंद आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच वेगळा अनुभव देईल,’ असं दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांने सांगितलं. बॉलिवूडमधील स्पोर्ट्सवर आधारित चित्रपटांसारखीच भव्य दिव्यता प्रथमच या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, नयन जाधव, प्रकाश धोत्रे अशी स्टारकास्ट असून कॅमेरामन म्हणून प्रताप नायर तर मंगेश धाकडे हे संगीतकार म्हणून काम पाहणार आहेत.